कोरोनाने गेल्या वर्षभरात जगभर थैमान घातले आहे. वृद्ध, अपंग, गरीब, श्रीमंत, बालके, स्त्रिया कोणीही त्याच्या तावडीतून सुटले नाही. अनेक निष्पाप, निरपराध लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. जगभर मृत्यूचे तांडव चालू आहे. आणि 33 कोटी देव, अल्ला, गॉड, जीजस आणि कोण जगन्नियंता, कृपाळू, दयाळू, आकाशातील बाप हे जे कोणी असतील ते फक्त उघड्या डोळ्यांनी पहात बसले आहेत. ते काहीही करू शकत नाहीत. त्यांचे भक्त जरी कोरोनाने मरत असले तरी ते त्याला वाचवू शकत नाहीत. हे सगळे देव काहीही करू शकत नाहीत. आणि त्यांचे दलाल असलेलेबा बाबा, बुवा, बापू-कापू, अम्मा-टम्मा, फकीर, मौलवी, पास्टर, फादर हे सगळे 'अशक्य ते शक्य' करून दाखवण्याचा दावा करणारे भोंदू लोक केवळ या तापलेल्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्यात व्यस्त आहेत. ते त्यांच्या अलौकिक जादुई शक्तीने एखाद्या रुग्णाला बरे करू शकत नाहीत. हे स्पष्टपणे दिसत आहे. तरीही भक्त म्हणवणारी जमात पुन्हापुन्हा त्यांच्या जाळ्यात अडकताना दिसतच आहे. या कोरोना महामारीने सिद्ध केले आहे की कोणत्याही धर्माचा कोणताही देव किंवा देवाचा दलाल तुमचे दुःख दूर करू शकत नाही. म्हणून या देवांवर आणि त्यांच्या दलालांवर पैसा खर्च करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, संशोधन, भौतिक सुविधांचा विकास यांवरच जनतेने आणि शासनाने पैसा खर्च करायला हवा. या महामारीतून हा धडा निश्चितच मिळतोय. तो आपण घ्यायला हवा. आपण लवकरात लवकर शहाणे व्हायला हवे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा