Monday, July 27, 2020

पाण्याच्या वापराबाबत कंजूषपणाच हवा

  माझ्या पाहण्यातील एक गाव. एकेकाळी पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होते. दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीच्या पाण्यावर चालणारी सिंचन योजना कार्यान्वित झाली आणि परिसरात पाणी आले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पडीक जमिनी लागवडीखाली यायला लागल्या. गावाच्या भाळी असलेला दुष्काळ कायमचा मिटला. पाण्यासाठी या गावाने खूप सोसले होते. पाणी घेऊन येणाऱ्या टँकरची तासंतास वाट पाहिलेल्या लोकांचे हे गाव. रात्री-अपरात्री कधीही टँकर आला तर लोकांची पाणी घेण्यासाठी झुंबड उडायची. टँकरच्या पाण्यासाठी भांडणे व्हायची. पण या दोन-तीन वर्षात गावाचे सगळे रूपच बदलून गेले. गावाच्या चारी बाजूला हिरवळ नांदू लागली. पण याबरोबरच पाण्याची उधळपट्टी ही वाढू लागली. आधी पुरवून पुरवून पाणी वापरणारे लोक आता वारेमाप पाणी उधळताना दिसू लागले. गावातील एका व्यक्तीला सहज म्हणालो, "लोक पाणी असे वाया घालवतात ते योग्य नाही." तर तो म्हणाला, "जाऊ दे ना वाया. भरपूर पाणी आहे. थोडे वाया गेले तर काय बिघडते?"
   दुष्काळातून नुकत्याच सु काळात आलेल्या गावाची ही अवस्था तर ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच भरपूर पाणी आहे, जे नदीकाठाला राहतात, त्या लोकांची मानसिकता काय असेल याचा विचार न केलेलाच बरा.
   खरे तर पाणी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. पाण्याचा कितीही सुकाळ आला तरी पाण्याचा वापर काटकसरीनेच करायला हवा, हे आमच्या लोकांना कोणीतरी सांगायला हवे. आपल्या भागात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे, हे जणू काही लोक विसरूनच गेले आहेत. आता जरी आपल्याकडे पाणी आले असले तरी ते पाणी येण्यासाठी हजारो युनिट्स वीज खर्च करावी लागली आहे. (आणि अजूनही वीज खर्च केल्याशिवाय पाणी आपल्याकडे येत नाही.) लाखो लिटर्स पेट्रोल-डिझेल खर्च करावे लागले आहे. हजारो झाडे तोडावी लागली आहेत. याचे भान लोकांनी ठेवायला हवे. आपण जरी नदीकाठाला राहत असाल तरी तुमच्या घरापर्यंत आणि शेतीपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी वीज खर्च करावी लागतेच. त्यामुळे आपण पाणी वाया घालवल्यास वीज आणि पाणी या दोन्हींचीही उधळपट्टी होते. म्हणून पाण्याची उपलब्धता कितीही वाढली, तरी पाण्याचा उपयोग काटकसरीने करायला हवा. नव्हे पाण्याच्या बाबतीत तर कंजूषपणाच करायला हवा. 

No comments:

Post a Comment