रविवार, ५ जुलै, २०२०

शाकाहार योग्य की मांसाहार?

       
हा प्रश्न तसा खूप जुना आहे. काहीजण भूतदयेच्या अंगाने हा प्रश्न उपस्थित करतात तर काहीजण नैतिकतेच्या अंगाने. तर काहीजण धार्मिकतेच्या अंगाने याकडे बघतात. प्रत्येकाचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. 
         विचारी किंवा विवेकी माणसाला धार्मिकतेच्या बाजूने विचारलेला प्रश्न अस्वस्थ करत नाही. कारण धार्मिक मते ही मुळातच बहुतांशी अविवेकी असतात. त्यामुळे विवेकी माणूस धार्मिकतेच्या अंगाने विचारलेल्या प्रश्नांना भिक घालत नाही. परंतु भूतदयेच्या किंवा नैतिकतेच्या अंगाने विचारलेले प्रश्न विवेकी माणसाला अस्वस्थ करतात, विचारांला प्रवृत्त करतात. त्यात बहुतांशी विवेकी लोक मांसाहार करणारे आहेत. (अविवेकी लोकांमध्ये सुद्धा मांसाहार करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त आहे.) त्यामुळे आपल्याकडून अविवेकी कृत्य घडत असेल तर विवेकी लोक स्वतःला दोषी मानतात. यातूनच मनात वैचारिक द्वंद्वाला सुरुवात होते. 
        मी स्वतःला विवेकी मानत नाही. परंतु विवेकाच्या बाजूचा मानतो. मी स्वतःला विवेकाच्या वाटेवरचा वाटसरू मानतो. मी अजूनही पूर्णपणे विवेकी झालो नाही. मी तसा होईन की नाही माहित नाही. परंतु मी विवेकी होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे हे मात्र नक्की. त्यामुळेच मला या प्रश्नाने अस्वस्थ केले, विचार करायला भाग पाडले. हे विचार करणे ही सुद्धा एक प्रक्रिया होती. वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या वेळी हा प्रश्न मनात उभा राहिला. आणि वेगवेगळ्या प्रसंगी मी यावर विचार केला. कधी मटन आणायला गेलो असताना, कधी सिनेमा बघताना, कधी सोशल मिडीयावर व्हिडीओमध्ये वेगेवेगळ्या प्राण्यांना शिकारताना पाहताना, कधी वाचन करताना, तर कधी पाळलेल्या प्राण्यांना खाऊ-पिऊ घालताना, त्यांना गोंजारताना या प्रश्नावर विचार केला. कधी कधी फक्त निवांत असतानाही यावर विचार केला. या विचारमंथनातून जे निर्माण झाले ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.
          भूतदयेच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक जीवाला स्वतःचा जीव प्यारा आहे. प्रत्येक प्राण्याला स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे.  प्रत्येक सजीव जीवावरचे संकट दिसले की त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ही निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेली उपजत प्रवृत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचे मोल आहेच. पण निसर्गानेच यातल्या कित्येक जीवांचा हा जगण्याचा अधिकार सुद्धा मर्यादित केलेला आहे. निसर्गात असे कित्येक प्राणी आहेत की जे केवळ दुसऱ्या प्राण्यांना खाऊनच जिवंत राहू शकतात. त्यामुळे भक्षकाचे भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांना कितीही स्वतःचे जीवन महत्वाचे वाटले तरी निसर्गाने त्याचा जगण्याचा अधिकारच मर्यादित केला आहे. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की भूतदया हा निसर्गाचा विषय नाही. त्याच्या दृष्टीने भक्षक आणि भक्ष्य दोन्हींचे अस्तित्व टिकणे महत्वाचे आहे. भूतदया हा विषय मानवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण मानवच विचार करू शकतो. त्यालाच अनुकंपा, दया वगैरेंचे महत्त्व वाटते. 
          मांसाहारी प्राण्यांचे एक ठीक आहे. पण माणसाने प्राण्यांना खावे का? माणसासारख्या विचारी प्राण्याने तरी इतर प्राण्यांचा जगण्याचा अधिकार का नाकारावा? मांसाहारी प्राणी निसर्गतःच मांसाहारी आहेत. माणूस तसा आहे का? या प्रश्नाचा जरा शोध घेतला तर समजते की माणूस सुद्धा निसर्गतः मिश्राहारी आहे. पृथ्वीतलावर जन्माला आल्यापासून माणूस मांसाहार करत आला आहे. काही कीटकांपासून मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत अनेक जीवांना माणूस हा माणूस नव्हता तेव्हापासून खात आला आहे. जंगलात वणव्यामध्ये होरपळून मरण पावलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्यानंर मानवाला भाजलेले मांस जास्त चवदार लागते याचा शोध लागला. आणि नंतर मानवाने मांस आणि इतर पदार्थ सुद्धा भाजून खायला सुरुवात केली असे आपण शाळेत सुद्धा वाचले आहे. याचा अर्थच असा की मानव हा सुरुवातीपासूनच मिश्राहारी प्राणी आहे. मानवाला जवळचे असलेले माकडासारखे इतर काही प्राणी सुद्धा मिश्राहारी आहेत. जगातील प्राचीन वाङ्मयात सुद्धा माणसाच्या मांसभक्षणाची कित्येक वर्णने आली आहेत. उत्खननातील काही पुरावे सुद्धा माणसाच्या मांसभक्षणाची साक्ष देतात. म्हणजे माणूस केवळ शाकाहारी कधीच नव्हता. 
         दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्राण्यांना माणूस खातो, त्या प्राण्यांना तो वाढवतोही. हेच प्राणी नैसर्गिक अवस्थेत जंगलात भटकत असते तर त्यांना इतके आयुष्य लाभले असते का? जंगलात फिरणारी शेळी पाच वर्षे जगू शकली असती का? आज मानवाच्या आश्रयाखाली सरासरी सात ते दहा वर्षे शेळीचे आयुष्यमान असू शकेल. जंगलात हत्ती, वाघ, सिंह हे मोठे प्राणी म्हातारे होऊन मेलेले दिसतील. पण हरीण किंवा इतर छोटे प्राणी म्हातारे होऊन मेल्याचे दिसत नाही. याचे कारण यातील बहुतांशी प्राणी म्हातारे होण्यापूर्वीच शिकार झालेले असतात. माणूस सध्या मांसाहारासाठी जोपासत असलेले प्राणी जंगलात जगले असते त्यापेक्षा जास्त काळ माणसाच्या आश्रयाने जगत आहेत. म्हणजे त्यांना खाणारा माणूस त्यांचे आयुष्य कमी करत नाही तर उलट त्यांचे आयुष्य वाढवत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जंगलात या प्राण्यांना सतत भीतीखाली जगावे लागले असते. हेच प्राणी मानवाच्या आश्रयाखाली जेवढे आयुष्य जगत आहेत ते निर्धास्तपणे जगत आहेत. हे केवळ माणूस त्यांना खात असल्यामुळेच शक्य झाले आहे असे मला वाटते. माणूस या प्राण्यांना खात नसता तर त्यांना जंगलातच राहावे लागले असते, भीतीच्या छायेखालीच जगावे लागले असते आणि खूप कमी वयात दुसऱ्या कुठल्यातरी प्राण्याच्या हल्ल्यात त्यांना ठार व्हावे लागले असते. कारण मानवाने पाळलेले हे प्राणी निसर्गातील अतिशय दुर्बल प्राणी आहेत. 
       इथे मला वाटते भूतदया आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी निकालात निघतात. माणूस हा मुळातच स्वतःचे जीवन अधिक रोचक, मोहक करणारा प्राणी आहे. पण या नादात त्याने निसर्गाचाच विध्वंस करू नये ही अपेक्षा रास्त आहे, यावर दुमत असू नये.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा