शुक्रवार, २७ मार्च, २०२०

देव कधी मदतीला येणार?


    'देवदर्शनाला जाताना गाडीला अपघात: इतके लोक ठार आणि इतके लोक जखमी, देवदर्शनाहून परतताना अपघात होऊन इतके भाविक ठार आणि इतके जखमी'
अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. पण त्या बातम्या वाचून आपण तिथेच सोडून देतो. त्यावर विचार खूप कमी करतो. आता बातमी वाचली 'इस्लामपूरमध्ये हज यात्रेवरून आलेल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग'. इतकेच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर वीसेक लोकांनाही संसर्ग झाला आहे. ही आतापर्यंत उघड झालेली संख्या आहे. ही संख्या वाढतच जाणार आहे.
    मला प्रश्न पडतो, की जे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवाच्या दर्शनाला गेले त्यांना देवाने का वाचवले नाही? ज्यांनी आयुष्यभर देवाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि बरेच काही केले त्या भाविकांना वाचवण्यासाठी देव का पुढे आला नाही? आणि महत्वाचे म्हणजे हे वारंवार घडले आहे. अगदी इतिहासात बघितले तरी आपणाला दिसेल की कोणत्याही संकटाच्या प्रसंगी कोणताही देव मानवाच्या मदतीला आला नाही. अनेक साथीचे रोग आले. लोकांनी अनेक पूजापाठ आणि इतर अनेक प्रकार केले. पण एकाही देवाला साथीचे रोग घालवता आले नाहीत. देव उघड्या डोळ्यांनी आपल्याच भक्तांचे मृत्यू होताना बघत राहिले. साथीचे रोग आटोक्यात आणले शास्त्रज्ञांनी. त्यांनी वेगवेगळ्या रोगांवर लसी शोधून काढल्या आणि त्यामुळे काही रोग आटोक्यात आले तर काही चक्क नामशेष झाले.
आपल्या देशात तर देवांची महागर्दी आहे. आणि ९९% लोक देवभोळे. पण तरीही आमचा देश मागासच राहिला. अनेकांनी आमच्या देशावर आक्रमणे केली. देश लुटला, जनतेवर अत्याचार केले, देशाला गुलाम केले. पण आमचे देव मात्र ढिम्मच राहिले. कोणताही देव मदतीला आला नाही. परकीय आक्रमणे, रोगांच्या साथी, नैसर्गिक आपत्ती यांमुळे कित्येक स्त्रिया विधवा झाल्या, कित्येक आयांना स्वतःच्या मुलांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. पण आमचे देव भक्तासाठी जराही धावले नाहीत. देशातील ९९% जनतेने केलेल्या भक्तीचा काय उपयोग झाला?
२०१३ साली केदारनाथ येथे पूर येऊन संपूर्ण केदारनाथ गाव उध्वस्त झाले. करोडो रुपयांची हानी झालीच, पण ५०००पेक्षा जास्त लोक मरण पावले. पण केदारनाथ फक्त बघत राहिला. त्याने काहीही केले नाही. भक्त  पुराच्या पाण्यातून वाहून जात होते आणि केदारनाथ एका ठिकाणी स्थिर होता. मोठ्या श्रद्धेने तिथे गेलेल्या भाविकांना काय मिळाले? मृत्यू मिळाला त्यांना.  पण आम्ही मात्र केदारनाथ मंदिर पुरातून कसे वाचले याचीच चर्चा करत राहिलो. भक्त का मेले याची चर्चा केलीच नाही.

    याच अध्यात्मिक देशात हजारो वर्षे दलितांवर अनन्वित अत्याचार होत राहिले. देवाने काहीच केले नाही. निष्पाप बालिकांवर बलात्कार झाले. देवाने काहीच केले नाही. अगदी मंदिरात सुद्धा बलात्कार झाले. देवाला त्या बालिकांचे आवाज ऐकू आले नाहीत. याच देशात राजकारणी लोक दिवसा-ढवळ्या कायदेशीर-बेकायदेशीर दरोडे घालत आहेत. बिनदिक्कत खोटे बोलत आहेत. देव त्यांचे काहीही वाकडे करत नाही. सगळी पापे करून ते अगदी धार्मिक मार्गाने पापक्षालन करून घेऊन नवी पापे करायला तयार होत आहेत. आणि आमचा देव? तो फक्त म्हणत आहे 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' अरे किती दिवस? किती दिवस पाठीशी राहणार आहेस? कधीतरी समोर ये ना. भक्तांचे रक्षण कर ना. पण तो समोर येतच नाही. भक्तांचे रक्षण करतच नाही.
    आता हेच बघा ना. आता कोरोनाचे भयानक संकट मानवजातीसमोर उभे ठाकले आहे. पण इथेही कोणत्याही देवाची भक्ती, पूजापाठ कामाला येत नाही. देवाकडे सगळ्या समस्यांची उत्तरे आहेत असे भक्त सांगतात. पण खुद्द भक्त समस्यांनी हैराण असताना सुद्धा देव त्याला वाचवायला येत नाही. भारतातील ३३ कोटी देव, मुस्लिमांचा अल्ला, ख्रिश्चनांचा गॉड यांपैकी कोणीही आपल्या भक्तांसाठी धावून यायला तयार नाही. कोणीही चमत्कार दाखवायला तयार नाही. ज्यांच्यासाठी आम्ही एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहिले नाही, ज्यांच्यासाठी आम्ही अनेकांचे मुडदे पाडले, ते देव, गॉड, अल्ला, आणखी कुणी याच पद्धतीचा प्रेषित, देवदूत, बाबा-बुवा मदतीला धावला नाही. मदतीला धावत आहेत ती फक्त माणसे आणि माणसांनी शोधलेले विज्ञान. ज्याने 'माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत' असा दावा केला त्याने मैदानातून पळ काढला. आणि ज्याने 'मला आतापर्यंत इतकेच समजले आहे. यापुढील गोष्टी मला माहीत नाहीत. प्रयत्नांती त्या माहीत होऊ शकतील' अशी नम्र भूमिका घेतली ते विज्ञान मात्र चिकाटीने या संकटाला भिडत आहे. औषधाचा शोध घेत आहे.
    आणि तरीही जगभरतील भक्त लोक म्हणत आहेत, जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते.
ही मानसिक गुलामगिरी कधी संपणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा