Wednesday, April 21, 2021

कोरोनाचा धडा

 कोरोनाने गेल्या वर्षभरात जगभर थैमान घातले आहे. वृद्ध, अपंग, गरीब, श्रीमंत, बालके, स्त्रिया  कोणीही त्याच्या तावडीतून सुटले नाही. अनेक निष्पाप, निरपराध लोक कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. जगभर मृत्यूचे तांडव चालू आहे. आणि 33 कोटी देव, अल्ला, गॉड, जीजस आणि कोण जगन्नियंता, कृपाळू, दयाळू, आकाशातील बाप हे जे कोणी असतील ते फक्त उघड्या डोळ्यांनी पहात बसले आहेत. ते काहीही करू शकत नाहीत. त्यांचे भक्त जरी  कोरोनाने मरत असले तरी ते त्याला वाचवू शकत नाहीत. हे सगळे देव काहीही करू शकत नाहीत. आणि त्यांचे दलाल असलेलेबा बाबा, बुवा, बापू-कापू, अम्मा-टम्मा, फकीर, मौलवी, पास्टर, फादर हे सगळे 'अशक्य ते शक्य' करून दाखवण्याचा दावा करणारे भोंदू लोक केवळ या तापलेल्या तव्यावर स्वतःची पोळी भाजून घेण्यात व्यस्त आहेत. ते त्यांच्या अलौकिक जादुई शक्तीने एखाद्या रुग्णाला बरे करू शकत नाहीत. हे स्पष्टपणे दिसत आहे. तरीही भक्त म्हणवणारी जमात पुन्हापुन्हा त्यांच्या जाळ्यात अडकताना दिसतच आहे. या कोरोना महामारीने सिद्ध केले आहे की कोणत्याही धर्माचा कोणताही देव किंवा देवाचा दलाल तुमचे दुःख दूर करू शकत नाही. म्हणून या देवांवर आणि त्यांच्या दलालांवर पैसा खर्च करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग, संशोधन, भौतिक सुविधांचा विकास यांवरच जनतेने आणि शासनाने पैसा खर्च करायला हवा. या महामारीतून हा धडा निश्चितच मिळतोय. तो आपण घ्यायला हवा. आपण लवकरात लवकर शहाणे व्हायला हवे.

Sunday, February 28, 2021

कोरोनाने जुळवली अल्पवयीन मुलांची प्रेम प्रकरणे



ऑनलाइन शिक्षण सुरू होऊन महिनाभर झाला असेल किंवा नसेल अशा काळात माझा एक मित्र माझ्याकडे त्याचा मोबाईल घेऊन आला. आणि त्याने मला सांगितले की 'या मोबाईलमध्ये बघ. नको तसले मेसेज येत आहेत. ते बंद कसे करायचे तेवढे मला सांग.' मी मोबाईल पाहिला. ब्राउझर मध्ये येणाऱ्या नोटिफिकेशन्सना तो 'मेसेज' म्हणत होता. ते नोटिफिकेशन्स पॉर्न साईट्स वरून येत होते. चांगल्या प्रकारे इंटरनेटचे ज्ञान असणाऱ्या माणसाला माहीत हे असते की नोटिफिकेशन्स आपोआप येत नाहीत. ज्यावेळी आपण एखाद्या वेबसाईटला भेट घेतो, त्यावेळी ती वेबसाइट आपणाला विचारते की, आम्ही आमचे नोटिफिकेशन आपल्याला पाठवू का? त्या वेळी आपण परवानगी दिली असेल तरच अशी नोटिफिकेशन्स ब्राऊजरमध्ये येतात. सहाजिकच माझ्या मित्राच्या मोबाईल वरून कुणीतरी अशा नोटिफिकेशन्सना परवानगी दिली होती. जास्त चौकशी केल्यावर समजले की ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यामुळे मित्राचा मोबाईल जास्तीत जास्त काळ त्याच्या मुलाच्या हातामध्ये होता. आठवीत शिकणारा त्याचा मुलगा उत्सुकतेमुळे म्हणा किंवा कोणीतरी सांगितल्यामुळे म्हणा मोबाईलमध्ये पॉर्न बघायला लागलेला होता. मी त्या मोबाईल मधील फेसबूक उघडले. मित्र फेसबुक वापरत नव्हता. परंतु फेसबुक वर त्याच्या मुलाने एका अकाऊंट तयार केलेले होते. फेसबुकवर त्याच पद्धतीचे (प्रौढांसाठी असलेले) काही ग्रुप्स त्याने जॉईन केलेले दिसले. नंतर व्हाट्सअप, शेअर चॅट या ॲप्लीकेशनवरही थोडी नजर टाकली. तिथे काही फारसे आक्षेपार्ह आढळले नाही. परंतु काही नंबर्सवर चॅट करून नंतर ते डिलीट केले असल्याचे जाणवत होते. एकंदरीत मुलाचे अभ्यासापेक्षा सेक्स, प्रेम याच गोष्टींकडे जास्त लक्ष असल्याचे दिसत होते.
या घटनेमुळे मला ज्यांची मुले शाळकरी वयातील आहेत अशा मित्र, शेजारी, नातेवाईक यांचे मोबाईल (अर्थात त्यांच्या परवानगीने) चेक करण्याचा, तपासण्याचा नादच लागला. आणि त्यातून मला बऱ्याच गोष्टींचा शोध लागला. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे बरीच अल्पवयीन मुले (सर्वच नव्हे) पॉर्न पाहू लागलेली आहेत. मित्रांनी पाठवलेल्या लिंक्स, युट्युब, काही ॲप्सच्या जाहिराती किंवा उत्सुकता म्हणून मुलांनी केलेल्या सर्चमुळे मुले पोर्नोग्राफीकडे वळली आहेत. यात मुलीही आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे अनेक अल्पवयीन मुला-मुलींची प्रेमप्रकरणे जुळली आहेत. वयात आलेल्या मुला-मुलींना एकमेकांशी मुक्तपणे बोलणे एरव्ही अनेक कारणाने शक्य नसते. परंतु मोबाईल हातात आल्यामुळे आपल्या आवडत्या मुलाशी/मुलीशी बोलणे त्यांना सहज शक्य झाले आहे. विशेषतः मुलींच्या हातात मोबाईल असल्याचे पाहून अनेक तरुण मुलांनी त्यांना मेसेज पाठवले असल्याचे लक्षात आले. सुरुवातीला अभ्यासाचे बोलणे, अभ्यासातील अडचणी सोडवणे, शंका विचारणे; नंतर इतर औपचारिक गप्पागोष्टी करत करत चॅटींगची गाडी प्रेमापर्यंत पोहोचलेली दिसली. काही मुलांनी आपले चॅट्स डिलीट करण्याचेही कष्ट घेतलेले नव्हते. पालकांच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यांनी बिनधास्तपणे 'प्रेम-गप्पा' केल्याचे दिसून येत होते. लॉकडाउनच्या काळात प्रत्यक्ष भेटता येत नव्हते. परंतु लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मात्र ती मुले-मुली एकमेकांना प्रत्यक्ष भेटलेली आहेत असेही दिसून आले.
या गोष्टी पालकांच्या नजरेस आणून दिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. काही पालकांना तर आपले मूल असे करणारच नाही, असा विश्वास होता. पण पुरावे समोर होते. त्यामुळे विश्वास ठेवावा लागला. पालकांना मी काही सूचना आणि टीप्स दिल्या खऱ्या, परंतु त्यांचा कितपत उपयोग होईल याबाबत मलाच खात्री नाही.

आपल्या समाजात अल्पवयीन मुलांची प्रेमप्रकरणे नव्हती असे म्हणण्याचे धाडस कोणी करणार नाही. मोबाईल, इंटरनेट यांसारखी आधुनिक साधने नव्हती त्या काळातही अशी प्रेमप्रकरणे होत होती. त्यातील काही उघडसही येत होती. अशी प्रेमप्रकरणे होती, म्हणूनच त्यावर आधारित शाळा, टाईमपास, फॅन्ड्री यांसारखे चित्रपट निघाले. पण अशी प्रेमप्रकरणे आत्ताच्या काळाशी तुलना करता कमी प्रमाणात होती. मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया यांच्या उदयानंतर अशा प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यातही कोरोनामुळे त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे हे वास्तव आहे. आणि विशेष म्हणजे या गोष्टीची पालकांना गंधवार्ताही नाही. मुले मोबाईल घेऊन बसतात म्हणजे अभ्यासच करत आहेत, असा समज बऱ्याच पालकांनी करून घेतलेला आहे. काही पालकांना मुले अभ्यास न करता इतरच गोष्टी करत आहेत याची जाणीव आहे. परंतु तरीही नाईलाज आहे म्हणून ते दुर्लक्ष करत आहेत. याचाच फायदा घेऊन मुले पोर्नोग्राफी आणि प्रेमप्रकरणांकडे वळली आहेत. भविष्यात अल्पवयीन मुलांची प्रेमप्रकरणे वाढतच जाणार अशी लक्षणे दिसत आहेत. कारण ज्या गोष्टीची मुलांच्या पालकांना जरासुद्धा गंधवार्ता नाही त्या गोष्टी थांबवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील असे सध्या तरी दिसत नाही.