विचारांती
देश आणि राज्यातील चालू घडामोडींवर मनात आलेले मुक्त विचार या ब्लॉगवर मांडलेले आहेत. याशिवाय दैनंदिन जीवनातील काही महत्त्वाच्या विषयांवरील हे मुक्त चिंतन आहे. यातील काही आपल्याला आवडेल, काही आवडणार नाही. आवडल्यास जरूर सांगा. न आवडल्यास कारणासहित सांगा. व्यक्त होताना भाषेची मर्यादा मात्र पाळा. शिवराळ आणि द्वेषपूर्ण कमेंट्स डिलीट केल्या जातील.
बुधवार, ७ मे, २०२५
धारकऱ्याला पत्र
शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५
या कोंडलेल्या वाफेचे काय करायचे?
कुकरमध्ये प्रचंड वाफ कोंडली आणि त्या वाफेला बाहेर पडायची संधीच मिळाली नाही तर काय होईल? कुकरचा स्फोट होईल. अशीच स्फोटक परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आहे. हे मी प्रत्येक गावात असलेल्या लग्न न झालेल्या मुलांबद्दल लिहीत आहे. आज प्रत्येक गावात तिशी-चाळीशी ओलांडलेली आणि तरीही लग्न न झालेली शेकडो मुले सापडतील. एका गावात लग्न न झालेला एखाद-दुसरा माणूस असणे नॉर्मल म्हणता येईल. दीर्घकालीन आजारपण, मनोरुग्णता, अपंगत्व यामुळे गावात एक-दोन माणसे बिना लग्नाची असू शकतात. पण एका गावात शेकडो मुले बिना लग्नाची असणे हा आपल्या समाजाला रेड सिग्नल आहे.
आज-काल वयात येण्यापूर्वीच मुलांच्यामध्ये लैंगिक भावना जागृत झालेल्या दिसतात. टीव्ही, सिनेमे, मोबाईल यांमुळे वयात येण्यापूर्वीच प्रेम, सेक्स वगैरे गोष्टी मुलांच्या कानावर आलेल्या असतात. त्याबद्दल आकर्षणही निर्माण झालेले असते. त्यामुळे वयात आल्याबरोबर या सगळ्या भावना उफाळून येतात. तरीही सामाजिक बंधनांमुळे काही काळ या भावना दाबून ठेवल्या जातात. परंतु योग्य वेळी या भावनांना वाट मोकळी करून देणे आवश्यक असते. पण आज-काल योग्य वेळी मुलांची लग्न होतात कुठे? ज्या वयात ह्या भावना उफाळून येतात त्याच वयात या भावना तितक्याच क्रूरपणे दाबून टाकाव्या लागतात. दीर्घकाळ या भावना दाबून टाकल्या तर या भावनांचा स्फोट होऊ शकतो. हा स्फोट कोणत्याही रूपाने समोर येऊ शकतो. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडणे, इतरांना इजा करणे, भांडणे करणे, स्त्रिया-मुलींची छेडछाड करणे, बलात्कार करणे, शिव्या देणे, आत्महत्या करणे अशा कोणत्याही प्रकारे या भावनांचा स्फोट होऊ शकतो. आणि या सगळ्याच गोष्टी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने भयंकर आहेत.
नोकऱ्या नसल्यामुळे आणि शेतीला प्रतिष्ठा नसल्यामुळे अविवाहित राहिलेल्या आणि त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेल्या तरुणांचा एक गटच गावोगावी पाहायला मिळतो. कुठेतरी स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने कामाला जाऊन आलेल्या पैशांतून दारू पिऊन आपले फ्रस्ट्रेशन घालवण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण नशा उतरल्यानंतर फ्रस्ट्रेशन सतावतच असते. त्यातच भावना चाळवणारे सिनेमे, मालिका त्यांच्या समोरच असतात. त्यांच्या समोरच त्यांचा वर्गमित्र बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला गेलेला असतो. तिथले फोटो तो सोशल मीडियावर टाकत असतो. या गोष्टी मनातून भयंकर त्रास देत असतात. कल्पना करा, कुठेतरी कामाला गेल्यावर यांच्या तावडीत एखादी स्त्री सापडली तर तिचे काय होईल? ते तरुण भले बलात्कारी मानसिकतेचे नसले; तरीही त्या स्त्रीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा उपद्रव त्यांच्याकडून नक्कीच होणार. वर्षानुवर्षे कोंडलेली वाफ अशावेळी स्फोटक पद्धतीने बाहेर पडण्याची खूप शक्यता असते.
काही धर्मांध संघटनांना दंगली घडवण्यासाठी रिकामे हात हवेच आहेत. डोक्यामध्ये फ्रस्ट्रेशन असलेले हे तरुण त्यांच्यासाठी आयतेच उपलब्ध होतील. आणि प्रचंड विध्वंस घडवणाऱ्या दंगली होतील.
त्यामुळे समाजाने सावध होणे आवश्यक आहे. सावध व्हायचे म्हणजे केवळ स्त्रिया-मुलींना या तरुणांपासून दूर ठेवणे नव्हे. हा वरवरचा उपाय झाला. आणि तोही फारसा परिणामकारक नाही. समस्येचे मुळातूनच उच्चाटन व्हायला हवे. खाली काही उपाय सुचवत आहे. विचारी वाचक त्यामध्ये भर घालू शकतात, तसेच दुरुस्तीही सुचवू शकतात.
१) पहिला उपाय आहे रोजगाराचा प्रश्न सोडवणे. हा उपाय बहुतांशी शासनाच्या अखत्यारीतील आहे. शासनाने अशिक्षित, अल्पशिक्षित आणि शिक्षित तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. खाजगीकरणाचे धोरण कमी करून सरकारी उद्योगांची संख्या वाढवायला हवी. कारण खासगी उद्योग त्यांच्या नफ्याला प्राधान्य देतात. त्यामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यावर त्यांचा भर असतो. साहजिकच ते कमीत कमी नोकर भरती करतात. शासनाने भविष्यातील संकटाचा विचार करून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी.
२) गर्भपातावर कठोर कारवाई करणे. गेल्या वीस वर्षात गर्भलिंगनिदान चाचण्या आणि त्यानंतर गर्भपात या गोष्टींमुळे मुलींची संख्या प्रचंड कमी झाली आहे. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचण्या आणि गर्भपात करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.
३) लग्न न झालेल्या मुलींनी स्वतःच्या अपेक्षा कमी करणे ही आवश्यक गोष्ट आहे. केवळ नोकरीवाला मुलगा पाहिजे या अपेक्षेतून वयाची तिशी ओलांडेपर्यंत अविवाहित राहिलेल्या मुलींची संख्याही बरीच मोठी आहे. या मुलींचे काउंसेलिंग केले पाहिजे. नोकरी हेच सर्वस्व नाही, शेतीमधून सुद्धा चांगले उत्पन्न मिळवता येते, ही गोष्ट त्यांना पटवून द्यायला हवी. त्यांना या अविवाहित मुलांशी लग्न करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.
४) चौथी गोष्ट समाज म्हणून आपल्याला कदाचित पटणार नाही; पण भविष्यातील विस्फोट टाळण्यासाठी ही गोष्ट करणे आवश्यक आहे. अविवाहित मुलांना 'मोकळे' होण्यासाठी प्रत्येक गावात काहीतरी सुविधा असायला हवी. साठलेली वाफ बाहेर पडण्यासाठी कुकरला शिट्टी असते. त्यातून थोडी थोडी वाफ बाहेर पडली तर कुकरचा स्फोट होणे टळते. तसेच या मुलांच्या आत साठलेली वाफ थोडी थोडी बाहेर टाकण्याचा काहीतरी मार्ग उपलब्ध असायला हवा. या मुलांनी स्वतःहून गावात एखाद्या महिलेशी/मुलीशी सूत जमवले तर त्याकडे कानाडोळा करायला हवा. त्यांची बदनामी करणे टाळायला हवे. अविवाहित मुला-मुलींनी एकमेकांशी प्रेमसंबंध जोडण्यात काहीही चूक नाही. विशेषतः वय वाढल्यानंतरही लग्न न झालेल्या तरुण-तरुणींना लग्नाशिवाय शरीरसंबंध करण्याची परवानगी असायला हवी. समाजाने ही परवानगी खुलेपणाने द्यायला हवी. असे संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांना समाजाने कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये.
वरील उपाय सोपे नसले तरी फारच अवघड किंवा अशक्य नक्कीच नाहीत. हे उपाय करता येण्यासारखे आहेत. समाजातील एक घटक म्हणून आपण स्वतः कोणता उपाय करू शकता, कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्याकडे एखादा उपाय असेल तर तोही नक्कीच सांगा.
सोमवार, ३ मार्च, २०२५
बलिदान मास: मुस्लीमद्वेष वाढवण्याचे हत्यार
बहुजन लोकांना कर्मकांडात अडकवण्याची वैदिकांची खुमखुमी कधीच जाणार नाही. बहुजन जेवढे कर्मकांडात अडकतील तेवढे आपले वर्चस्व अबाधित राहील याची वैदीकांना खात्री आहे. म्हणूनच सातत्याने ते नवनवीन कर्मकांडे निर्माण करीत आलेले आहेत अगदी ३०-४० वर्षांपूर्वी बहुजनांच्या घरात महालक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत होत नव्हते. पण बहुजन लेकी शिकायला लागल्या. विचार करायला लागल्या. मग त्यांना कर्मकांडात अडकवण्यासाठी या व्रतांची निर्मिती करण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी कुठल्याही गावात सत्यनारायण घातला जात नव्हता. तोही आमच्या माथी थोपला. हिंदू धर्मात घुसखोरी करून आपले वर्णवर्चस्ववादी अजेंडे वैदिकांनी नेहमीच राबवले आहेत.
अलीकडच्या काळात बलिदान मास नावाचे एक प्रकार एका संघटनेकडून महाराष्ट्रात सुरू केला आहे. औरंगजेबाच्या आदेशाने संभाजी राजांची हत्या केली गेली म्हणून हा बलिदान मास पाळला जाऊ लागला आहे. वरवर पाहता यात आक्षेपार्ह काही वाटणार नाही. पण हे बहुजनांच्या मुलांच्या डोक्यात मुस्लिमद्वेष भरवण्याचे कारस्थान आहे. इतिहासातली मढी उकरून आत्ताच्या मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे हे षडयंत्र आहे.
खरे तर इतिहासामध्ये या देशासाठी केवळ संभाजीराजांचा बली गेला आहे असे नव्हे. अगदी समाजजागृती करणाऱ्या संतांचाही खूनच झालेला आहे. इतर संतांचे मृत्यू संशयस्पद आहेत; पण तुकाराम महाराज यांचा खून ठळकपणे दिसून येतो. शिवाजी महाराज यांचा मृत्यूही नैसर्गिक नाही. त्यांनाही या मातीसाठी बलिदानच द्यावे लागले आहे. शहीद भगतसिंग यांनी या मातीसाठीच बलिदान दिले ना? महात्मा गांधींचे बलिदान या देशासाठीच होते. अशा शेकडो लोकांचे बलिदान या देशासाठी झालेले आहे. कुणा-कुणाकुणाचा बलिदान मास पाळणार? ते या महामानावांचा बलिदान मास पाळणार नाहीत. कारण या बलिदानामध्ये त्यांच्याच पूर्वजांचे हात रक्ताने रंगलेले आहेत. स्वातंत्र्यलढ्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या विरोधात फितुरी करणारे त्यांचेच पूर्वज होते. स्वराज्याच्या विरोधात फितुरी करणारे त्यांचेच पूर्वज होते. आणि आता केवळ मुस्लिमद्वेष वाढवण्यासाठी त्यांना संभाजी राजांचा पुळका येतोय. जेम्स लेनने राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे तेव्हा त्यांना पुळका आला नाही. राज्यपाल भगतसिंग कोशियारी याने शिवरायांचा अपमान केला. अहमदनगर मधील भाजपचा नगरसेवक छिंदम यांने शिवरायांचा अपमान केला. भाजपचा पदाधिकारी सुधांशू द्विवेदी याने शिवरायांचा अपमान केला. राहुल सोलापूरकर याने शिवरायांचा अपमान केला. प्रशांत कोरटकर यांने शिवरायांचा अपमान केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा वाऱ्याने पडला. या सगळ्या वेळी या संघटनेचा पुढारी तोंडात मूग गिळून गप्प बसला. तो बलिदान मासाचे नाटक करत आहे. पदोपदी शिवराय, जिजाऊ, छत्रपती संभाजी यांचा अपमान होत असताना तो गप्प बसतो आणि त्यांच्या बलिदानाचे भांडवल करून मुस्लिमद्वेष वाढवतो, हे षडयंत्र ओळखायला हवे.
बलिदान मास कसा पाळला जातो? संघटनेने दिलेली स्तोत्रे गायची, ज्या स्तोत्रांमध्ये मुस्लिमद्वेष ठासून भरलेला आहे. पायात चप्पल घालायची नाही. केस कापायचे नाहीत. नखे कापायची नाहीत. असला सगळा मूर्खपणा आहे. बलिदान मास पाळण्यासाठी दररोज चार-तास अभ्यास करण्याचे कर्मकांड का सांगितले नाही? बलिदान मास पाळण्यासाठी दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम करण्याचे कर्मकांड का सांगितले नाही? बलिदान मासात दररोज ग्रामस्वच्छता का केली जात नाही? असे उपक्रम घेतले जात नाहीत? कारण त्यांना विधायक काही करायचेच नाही. त्यांना केवळ लोकांना अंधश्रद्ध बनवणारे, लोकांना धर्मांध बनवणारे उपक्रमच हवे आहेत. समाजात इतके प्रश्न आहेत त्यावर हे कोणताही उपक्रम राबवणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यासाठी या संघटने कधीही आंदोलन उभारले नाही. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवले. शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांना आज्ञा दिल्या. शेतकऱ्यांना कर्जे पुरवली. शेतीची मोजणी करून नवीन शेतसारा पद्धत सुरू केली. पण उठता-बसता शिवरायांचे नाव घेणारे हे लोक शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत. बलिदान मासाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून एखादा दिवस धरणे आंदोलन करायला काय हरकत आहे? पण हे ते करणार नाहीत. त्यांना शेतकरी सुखी झालेला नव्हे गुलाम झालेला पाहायचा आहे. म्हणूनच आपल्या मुलांना त्यांच्या बलिदान मासापासून आणि इतर उपक्रमांपासून दूर ठेवायला हवे.
बुधवार, ४ डिसेंबर, २०२४
EVM मध्ये घोळ असल्याचे मारकडवाडी घटनेतून सिद्ध झाले
मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलट पेपरवर अभिरुप मतदान घेणार असल्याचे जाहीर करताच निवडणूक आयोगाची पाचावर धारण बसली. EVM मशिनद्वारे घेतलेल्या मतदानात झालेला घोटाळा उघड होऊ नये म्हणून प्रशासनाने गावकऱ्यांवर पोलीस बाळाचा वापर सुरू केला. 3 डिसेंबरला गावात शेकडो पोलीस तैनात केले. गावात जमावबंदी आदेश लागू केला. हा आदेश मोडला तर लोकांना अटक करण्याच्या धमक्या दिल्या. आणि शेवटी हे मॉक पोल उधळून लावले.
या घटनेतून काही प्रश्न उभे राहतात. हे मॉक पोलच तर होते. यातून प्रशासनाला, सरकारला काय धोका होता? हे गाव पातळीवरचे मतदान सरकार बदलणार नव्हते, आमदार बदलणार नव्हते, यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होणार नव्हता. कारण ज्यावेळी खरे मदतदान झाले होते तेव्हा तिथे कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झाला नव्हता. मग खोट्या मतदानाच्या वेळी तो निर्माण होण्याचे काहीच कारण नव्हते. या मॉक पोल मधून कोणताही प्रश्न निर्माण होणार नसताना प्रशासनाला याची भीती का वाटली? याचे साधे सरळ कारण आहे, यातून निवडणूक आयोगाचे आणि EVM चे पितळ उघडे पडणार होते. EVM मधून मतांची पळवापळवी झाल्याचे उघड होणार होते. त्यामुळे प्रशासनाने हे मतदानच होऊ दिले नाही. याचा थेट अर्थ असा होतो की निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीत EVM द्वारे गडबडी करून भाजपला सत्ता मिळवून दिली आहे. लोकशाही धोक्यात आहे ती याच कारणाने. लोकांची मते चोरण्याचा हा प्रकार लोकशाही मोडीत काढणारा आहे. आता ही लढाई लोकांनाच लढायला हवी. हिटलरी विचारधारा EVMमशिमध्ये घोळ करून भारतीय जनतेच्या डोक्यावर बसलेली आहे. तिला उखडून फेकण्यासाठी भारतीय जनतेला आता दुसरा स्वातंत्र्यलढा लढावा लागणार आहे, हे नक्की.