समजा तुम्हाला कोणी सांगितले, 'हनुमानाप्रमाणे तुम्ही डोंगर उचलून आणून दाखवा.' तर तुमचे उत्तर काय असेल? 'अरे तो हनुमान आहे. तो देव आहे. आपल्याला देवासारखे करायला कसे जमेल? आपण फक्त त्याची पूजा करायची. त्याच्यासारखा डोंगर उचलायचा प्रयत्न करायचा नाही. कारण तशी कामे करायला दैवी शक्ती लागते. ती आपल्याकडे कुठे आहे?'
थोडक्यात काय? तर आपल्याकडे दैवी सामर्थ्य नाही. त्यामुळे आपण देवासारखे वागण्याचा प्रयत्न करायचा नाही. अशीच सर्वसाधारण मानसिकता लोकांची असते.
या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाकडे पाहूया. शिवाजी महाराज माणूस होते. अगदी खराखुरा माणूस. माणसाच्या पोटी जन्माला आलेला माणूस होते ते. शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात अचाट पराक्रम गाजवला. तितकाच अचाट राज्यकारभारही केला. अगदी तळागाळातील माणसांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतले. शेतकरी, स्त्रिया, दीनदलित यांचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला. जनतेवर जुलूम-जबरदस्ती करणाऱ्यांना कडक शिक्षा केल्या. जहागीरदार, वतनदार, कुलकर्णी, पाटील या सर्वांना त्यांची जागा दाखवून दिली. हे स्वराज्य रयतेचे आणि रयतेसाठीच आहे, याची या सर्व जहागीरदार, वतनदार, कुलकर्णी, पाटील यांना जाणीव करून दिली. साहजिकच शिवाजी महाराज रयतेमध्ये लोकप्रिय झाले.
तर अशा खराखुरा माणूस असणाऱ्या शिवाजी महाराजांकडून पुढच्या काळात अनेकांनी प्रेरणा घेतली. अनेकांनी त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंग्रजांच्या नजरकैदेतून स्वतःची सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका करून घेताना जो मार्ग अवलंबला तोच मार्ग अवलंबून स्वतःची सुटका करून घेतली. यशवंत होळकरांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यामागे शिवप्रेरणा होतीच. क्रांतिसिंह नाना पाटलांनी शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरूनच इंग्रजांना सळो की फळ करून सोडले. भारतातच नव्हे भारताबाहेरही अनेकांनी शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतली आहे.
पण शिवाजी महाराजांचे हे सगळे कर्तृत्व निष्प्रभ करण्याचे षडयंत्र या महाराष्ट्रातच रचले जात आहे हे दुर्दैवी आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या हयातीपासूनच त्यांचे कर्तृत्व खुजे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तर लेखणी बहाद्दरांना रानच मोकळे सापडले. शिवाजी महाराजांना भवानी माता प्रसन्न होती, भवानीमातेने शिवाजी महाराजांना तलवार दिली होती. त्यामुळेच शिवराय इतका पराक्रम गाजवू शकले. अशा वावड्या उठवण्यात आल्या. म्हणजे शिवाजी महाराजांनी आयुष्यभर कष्ट सोसून, संघर्ष करून जो पराक्रम गाजवला, त्यात त्यांचे श्रेय काहीच नाही. त्यांनी जो पराक्रम गाजवला तो सगळा दैवी सामर्थ्यामुळे गाजवला. असा सगळा प्रचार केला अजूनही जात आहे. यासारखा शिवरायांचा दुसरा अपमान नाही. शिवाजी महाराजांनी ज्या हेतूने स्वराज्य स्थापन केले, ज्या हेतूने राज्यकारभार केला आणि तो करण्यासाठी जी झीज सोसली, त्या सगळ्यांचा हा धडधडीत अपमान आहे.
हे लोक शिवाजी महाराजांना भवानीमाता प्रसन्न करूनच थांबले नाहीत. त्यांनी आता खुद्द शिवाजी महाराजांनाच देव बनवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवाजी महाराजांचे नाव लिहिताना, बोलताना जाणीवपूर्वक 'श्री शिवाजी महाराज' असे म्हणायला सुरुवात केली आहे. शिवाजी महाराजांची मंदिरे उभी करायला सुरुवात केली आहे. तसेच शिवाजी महाराजांची आरतीही सुरू केली आहे. काही लोकांनी शिवाजी महाराज म्हणजे शिवशंकराचा अवतार आहे असा प्रचार करायला सुरुवात केली आहे. शिवाजी महाराज माणूस होते हेच नाकारण्याचा हा उद्योग आहे. हे खूप मोठे कारस्थान आहे. त्यांनी शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे खूप प्रयत्न करून पाहिले. त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. जिजाऊंची बदनामी करून पाहिली. त्यांच्या कुटुंबीयांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. पण शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की विरोधकांच्या सर्व बदनामी-मोहिमा वाया गेल्या. अजूनही शिवाजी महाराजांची बदनामी आणि अपमान करण्याचा प्रयत्न होतच आहे. आधुनिक काळात बाबा पुरंदरे, जेम्स लेन, छिंदम, कोश्यारी अशा अनेकांच्या माध्यमातून बदनामीचे प्रयत्न केले. पण शिवाजी महाराज बदनाम होता होत नाहीत. म्हणून त्यांचे दैवतीकरण जोरात सुरू ठेवले आहे.
महामानवांच्या दैवतीकरणाचा सर्वात मोठा तोटा म्हणजे प्रेरणा नष्ट होणे. मानवी इतिहासात महामानवांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन अनेकांनी अफाट पराक्रम गाजवले आहेत. पण ही प्रेरणाच नष्ट झाली तर पराक्रम गाजवणार कसे? 'कुठे शिवाजी महाराज आणि कुठे आम्ही? शिवाजी महाराज देव होते. त्यांच्यासारखे वागायला आम्ही देव आहोत का? त्यांनी स्त्रियांचा आदर केला; पण आम्हाला ते कसे शक्य आहे? त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला; पण आम्हाला ते कसे शक्य आहे? आम्ही काय देव आहात का? ते देव होते म्हणून त्यांनी जुलमी राजवट उलथवून टाकली. आम्हाला ते कसे जमणार? त्यांनी त्या काळात शेतकरी हिताचे निर्णय घेतले. असे निर्णय घ्यायला आम्ही काही देव आहोत का? आम्हाला शिवाजी महाराजांसारखे वागणे शक्यच नाही. कारण शिवाजी महाराज हे देव होते. देव जसे वागले तसे आपण वागायचे नसते, आपण फक्त देवाला पुजायचे असते.' अशी लोकांची मानसिकता झाली तर पुन्हा शिवकार्य उभे राहील का?
म्हणून शिवाजी महाराजांचे दैवतीकरण रोखणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांच्या दैवतीकरणाचे सगळे प्रयत्न हाणून पाडायला हवेत. 'श्री. शिवाजी महाराज' म्हणणे टाळायला हवे. त्यांची मंदिरे उभारायला विरोध करायला हवा. त्यांची आरती करण्याला विरोध करायला हवा. शिवाजी महाराज हे शिवशंकराचा अवतार आहेत असे म्हणणाऱ्या व्यक्तीला खडसावायला हवे आणि सांगायला हवे की शिवाजी महाराज हाडा-मांसाचा माणूस होते. त्यांनी चांगली नियत आणि तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर पराक्रम गाजवला आणि स्वराज्य स्थापन केले, असे सांगायला हवे. जिथे शिवाजी महाराजांची आरती म्हटली जात आहे तिथे शिवाजी महाराजांचा पोवाडा गाण्याचा आग्रह धरला पाहिजे. अशा प्रकारे दैवतीकरणाचा प्रयत्न करणाऱ्यांना ठामपणे रोखले पाहिजे. तरच शिवाजी महाराजांच्या कार्याचा अपमान थांबणार आहे आणि शिवप्रेरणा टिकून राहणार आहे. नाही तर शिवाजी महाराज हे केवळ देव्हाऱ्यातील देव बनून राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा