Saturday, June 25, 2022

प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे

    'प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच हवे' हे वाक्य माझे नाही. हे वाक्य मानसशास्त्रज्ञ आणि आणि शिक्षण तज्ञांचे आहे. अनेक मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ ओरडून जगाला सांगत आहेत की मुलांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच द्या. परंतु भारतात इंग्रजी माध्यमाचे खूळ लोकांच्या डोक्यात इतके घट्ट बसले आहे, की ऐपत नसतानाही काही लोक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालत आहेत. आपल्या मुलाला मातृभाषेतून शिकवले तर जणू काही अब्रू जाईल, असे त्यांना वाटते. भाषा म्हणजे गुणवत्ता नव्हे, हे त्यांना कुणीतरी सांगायला हवं. शिक्षणातील विविध संकल्पना समजणे, विविध कौशल्ये अंगी बाणणे, योग्य प्रकारे शारीरिक-मानसिक-भावनिक विकास होणे म्हणजेच शिक्षण होय. या गोष्टी होण्यासाठी मातृभाषाच उपयुक्त ठरते. परकीय भाषा यासाठी अडथळा ठरते . परकीय भाषेतून प्राथमिक संकल्पना विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजत नाहीत असे अभ्यासांतून समोर आले आहे. असे विद्यार्थी केवळ पाठांतर करून इयत्ता पास होत जातात. त्यांना विविध संज्ञा, संकल्पना समजतच नाहीत. 

    विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्राथमिक पाया पक्का झाल्यानंतर त्याला परकीय भाषेतून शिक्षण दिले तर चालू शकते. कारण त्याच्या बेसिक संकल्पना स्पष्ट झालेल्या असतात. तो प्रयत्नाने परकीय भाषेतूनही शिक्षण घेऊ शकतो.

    मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे नुकसान झाले असे एकही उदाहरण नाही. याउलट इंग्रजी भाषेतून शिक्षण घेतल्यामुळे नुकसान झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. घरात इंग्रजी भाषेचे वातावरण नसताना शाळेत इंग्रजी माध्यम निवडल्यामुळे अनेक मुलांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाल्याचे दिसून येते. आपल्याला हे जमणारच नाही, असा न्यूनगंड मनात निर्माण झालेली मुले पुढच्या आयुष्यातही अपयशी ठरण्याचा धोका असतो. अशी मनात न्यूनगंड निर्माण झालेली मुले शाळेतही इतर मुलांच्या पासून तुटक वागतात आणि घरी सुद्धा पालकांच्या पासून दुरावतात. 

    मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण घेऊनही मोठ्या हुद्द्यावर  असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला सहज समजू शकते की मातृभाषेतील शिक्षण निरर्थक नसते. गुणवत्तेचा आणि शिक्षणाच्या माध्यमाचा काडीचाही संबंध नाही. आणि असलाच तर मातृभाषेतील शिक्षणच जास्त गुणवत्तापूर्ण असते असे म्हणावे लागेल. कारण मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांचा पाया पक्का करते. 

    दुसरे एक निरीक्षण असे आहे की इंग्रजी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी स्वतःच्या पलीकडे समाजाचा फारसा विचार करताना दिसत नाहीत. स्वतःचे करिअर, स्वतःची प्रगती, स्वतःचे स्टेटस याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत असे विचार लहानपणापासूनच त्यांच्या मेंदूमध्ये रुजवले जातात. त्यामुळे पुढे जाऊन ही मुले स्वतःच्या पलीकडे फारसा विचार करताना दिसत नाहीत.  नातेवाईक, भावंडे, इतकेच नव्हे तर आईबाप सुद्धा त्यांच्या लेखी फारसे महत्त्वाचे नसतात. आज वृद्धाश्रमात जी गर्दी दिसते, त्यातील बहुतांश मुले इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहेत, हे जळजळीत वास्तव आहे.

    हे सगळे पाहता मराठी माणसांनी आपल्या मुलांना प्राथमिक शिक्षणासाठी मराठी शाळांमध्येच घालायला हवे, हे स्पष्ट होते. मी काही इंग्रजी भाषेचा द्वेष करत नाही. इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा आहे. जगातील आधुनिक ज्ञान मिळवण्यासाठी इंग्रजी भाषा शिकणे आवश्यकच आहे. आणि ती प्राथमिक शिक्षणात शिकवलीही जाते. पण शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजी भाषा प्राथमिक पातळीवर वापरणे चुकीचे आहे. ते अवैज्ञानिक आहे. घरात आपण नेहमीच इंग्रजी बोलत असाल तर आपण जरूर आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश द्यावा. पण आपण घरात मराठी भाषेत बोलत असाल आणि तरीही पाल्याला  इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याचा विचार करत असाल तर तुम्ही चूक करत आहात.


No comments:

Post a Comment