मंगळवार, १८ जून, २०२४

धर्माचे रक्षण देव स्वतः का करत नाहीत?

  





   धर्माचे ठेकेदार, बुवा-बाबा लोक आणि काही धार्मिक संप्रदाय नेहमी सांगत असतात की देवावर विश्वास ठेवा, देवाची भक्ती करा, पूजा-अर्चना करा, नामस्मरण करा, वगैरे वगैरे. हे सगळे केल्यावर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, आलेली संकटे जातील, अडलेली कामे होतील, इच्छांची पूर्तता होईल, नोकरी-व्यवसायात यश मिळेल, आजारपण दूर होईल, असे अनेक दावे केले जातात. मुद्दा हाच की देवाची भक्ती करा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, श्रद्धेने त्याची पूजा-अर्चना आणि इतर विधी करा, तुमच्या जीवनातील सगळे अडचणी दूर होतील. देवाबाबत इतके अचाट दावे हे लोक करत असतात.


    दुसऱ्या बाजूला हेच लोक लोकांना सांगतात, 'तुम्हारा धर्म खतरे में है. ते दुसऱ्या धर्माचे लोक तुमच्या धर्माला नष्ट करून पाहत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी तयार व्हा.' आणि मग एकत्र येऊन धर्मरक्षणाची प्रतिज्ञा करा, इथपासून घरात तलवारी ठेवा इथपर्यंत सल्ले दिले जातात. सल्ले कसले आदेशच ते. धर्मरक्षणासाठी धर्माबाबत कमी जास्त बोलणाऱ्याला शिवीगाळ करण्यापासून मारहाण आणि पुढे जाऊन खून करण्यापर्यंत जे काही करणे शक्य आहे ते करा, ते धर्मकार्यच आहे असे सांगितले जाते.


    वरील दोन गोष्टी पाहून मला एक मोठा प्रश्न पडतो. भक्तांचे सगळे प्रश्न सोडवणारा देव धर्मरक्षण स्वतःचे स्वतः करू शकत नाही का?

    एकीकडे देवाकडे अचाट शक्ती आहे, सगळ्या गोष्टींचा कर्ता करविता तोच आहे, भक्तांच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या अडचणी तो चुटकीसरशी दूर करू शकतो, वगैरे अफाट दावे केले जातात. इतका ताकदवान असणारा देव दुसऱ्या धर्माच्या लोकांपुढे दुर्बल होतो का? मुस्लिमांचा देव हिंदू काफिरांपुढे नांगी टाकतो आणि हिंदूंचे देव मुस्लिमांपुढे हतबल होतात असे काही आहे का? नेमके आहे तरी काय? या धर्म मार्तंडांनी एकदा काय ते स्पष्ट करावे. देव सर्वशक्तिमान असतील तर त्याने धर्मरक्षण स्वतःचे स्वतः करावे. कारण माणूस दुर्बल आहे. आणि जर देव सर्वशक्तिमान नसतील, त्यांना धर्मरक्षण करता येत नसेल तर अशा दुर्बल देवांची पूजा करायला धर्ममार्तंडांनी लोकांना सांगू नये. देव काहीही करू शकत नाहीत हे एकदाचे जाहीर करून टाकावे.

टीप- ही पोस्ट सर्व धर्मांना लागू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा