लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण या निवडणुकीत इंडिया आघाडीनेही अभूतपूर्व यश मिळवले आहे. याला कारण सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. सामान्य जनतेने जमेल त्या मार्गाने, सोशल मीडियाचा वापर करून, रस्त्यावर उतरून इंडिया आघाडीचा प्रचार केला. सर्व विरोधक एकत्र येणे ही सुद्धा गोष्ट पथ्यावर पडली. पण तो आजच्या चर्चेचा विषय नाही. आजच्या चर्चेचा विषय आहे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षाने केलेल्या घोडचुकीचा.
२०१२ पासूनच भारतातील मीडियाने विशेषतः टीव्ही चॅनल्सनी भाजपाच्या बाजूने प्रचार करण्यास सुरुवात केली होती. भारतातील बऱ्याच अंशी निष्पक्ष असणारा मीडिया २०१२ पासून पक्षपती बनल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला संपूर्ण देशभरात हार पत्करावी लागली आणि भाजपाला बहुमत मिळाले. जनतेने एकहाती सत्ता भाजपाला दिली. यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका भारतातल्या मीडियाने बजावलेली होती. काँग्रेसला सतत बदनाम करणे, खऱ्या-खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवणे हे काम मीडियाने सातत्याने केले. त्याचा परिणाम म्हणूनच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची प्रतिमा डागाळली गेली. हे सगळे स्पष्ट दिसत असताना २०१४ ते २०२४ या काळात विरोधी पक्षांमधील एकाही पक्षाने आपल्या स्वतःचा मीडिया उभा करण्याचा प्रयत्न केला नाही. या दहा वर्षात एकाही पक्षाला स्वतःची बाजू मांडणारे टीव्ही चॅनल उभे करता आले नाही. गोदी मीडिया बनलेले टीव्ही चॅनल्स दहा वर्षे सतत हिंदू-मुस्लिम करत राहिले; पण धर्मनिरपेक्षतेचा आवाज बनेल असे एकही टीव्ही चॅनेल विरोधकांना उभे करता आले नाही. एखाद्या पक्षाने टीव्ही चॅनल सुरु करणे कदाचित नियमात बसत नसावे. पण अन्य मार्गाने टीव्ही चॅनेल सुरु करणे अवघड नव्हते.
भाजपाने त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांचा आवाज विविध मार्गांनी बंद केला होता. त्यामुळे अभिसार शर्मा' अजित अंजुम, रविष कुमार, निखिल वागळे, हर्षदा स्वकुळ असे अनेक पत्र पत्रकार बेरोजगार झाले होते. त्यांनी आपापला मार्ग स्वतःच्या हिमतीवर शोधला. अशा पत्रकारांना जर योग्य विचारपीठ मिळाले असते तर त्यांनी भाजपा सरकारची सगळी अंडीपिल्ली अधिक ताकतीने बाहेर काढून जनतेला सजग केले असते आणि विरोधकांचा मार्ग सोपा झाला असता. भारतीय लोकशाहीला धोका उत्पन्न झाला नसता. पण भारतातल्या विरोधी पक्षांनी या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. पुढच्या काळात तरी विरोधक ही चूक सुधारतील अशी अपेक्षा करूया.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा