सोमवार, १५ जानेवारी, २०२४

देवधर्म, रोजगार आणि विकास

 


एका राज्यात खूप बेकारी वाढली होती. लोकांच्या हाताला कोणतेच काम नव्हते. रोजगार नसल्यामुळे गरिबीत वाढ होत होती. जनतेचे हाल होत होते. बेकारी कमी करण्याचा उपाय म्हणून तिथल्या राजाने एक योजना सुरू केली. त्याने राज्यातील प्रत्येक माणसाला काम देण्याची योजना घोषित केली. आणि खरोखरच प्रत्येक माणसाला काम मिळाले. कामाचे स्वरूप याप्रमाणे होते- राज्यातील काही लोकांनी रस्त्याच्या कडेने खड्डे काढत पुढे पुढे जायचे आणि उरलेल्या लोकांनी ते खड्डे बुजवत जायचे. यामुळे राज्यातील जनतेला सतत काम मिळत राहील याची खात्री होती. खरोखरच जनतेला काम मिळालेही. पण लवकरच सर्वांचा भ्रमनिरास झाला. ते राज्य दिवाळीखोरीत गेले. राज्याची तिजोरी पूर्ण रिकामी झाली. तिजोरीत नव्याने कोणतीही भर पडली नाही. या राज्यातील जनतेने खूप कष्ट केले; पण त्या कष्टांचा राज्याची तिजोरी भरण्यासाठी आणि राज्याचा विकास होण्यासाठी कोणताही उपयोग झाला नाही. लोकांना मिळालेला रोजगारही वांझोटा होता. त्यातून कोणतीच नवनिर्मिती होत नव्हती. नवीन संशोधन होत नव्हते. नवीन कौशल्य विकसित होत नव्हते. नवीन शिक्षण दिले जात नव्हते. देवधर्मातून मिळणारा रोजगार या स्वरूपाचा असतो. 


१) कोणत्याही देशाचा विकास होण्यासाठी केवळ तिथल्या जनतेला रोजगार देणे पुरेसे नसते. त्या रोजगारातून काहीतरी भरीव नवनिर्मिती होणे आवश्यक असते. त्या रोजगारातून नव्या संशोधनाला चालना मिळायला हवी. संशोधनाच्या गरजेतून शिक्षणाचा विकास व्हायला हवा. नवीन ज्ञान निर्माण करण्याची गरज निर्माण झाली पाहिजे. रोजगारातून वस्तू आणि सेवांचे अतिरिक्त उत्पादन होऊन त्या निर्यात व्हायला हव्यात. त्यातून देशाला परकीय चलन आणि नवीन तंत्रज्ञान मिळायला हवे. पैसा आणि नवीन तंत्रज्ञान यातून विकासाच्या नवीन संधी, नवीन क्षेत्रे उपलब्ध व्हायला हवीत. यातील कोणतीच गोष्ट देवधर्मातून मिळणाऱ्या रोजगारातून साध्य होत नाही. त्यामुळे देवधर्मातून उपलब्ध होणारा रोजगार हा वांझोटा रोजगार ठरतो.


२) दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवधर्मातून मिळणारा रोजगार ठराविक शहरापुरता मर्यादित राहतो. जिथे तीर्थक्षेत्र आहे तिथेच या रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आजूबाजूच्या परिसरातून पैशांचा ओघ या शहराकडेच वाहतो. यातून विकासाचा असमतोल तयार होतो. विषमता वाढते. शाश्वत विकासासाठी पैशांची देवाणघेवाण दुतर्फी व्हायला हवी. पैशांचा एकतर्फी ओघ केवळ आणि केवळ विषमताच वाढवतो. ठराविक शहरांचा विकास म्हणजे संपूर्ण देशाचा विकास नसतो. 


३) एखादे ठिकाण जर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित झाले तर तिथल्या अर्थव्यवस्थेतून सर्वसामान्यांचा पत्ता कट होत असतो. कुठल्याही तीर्थक्षेत्री जाऊन पहा, तिथल्या साध्या नारळ, उदबत्ती विक्रीच्या दुकानाचे भाडे सुद्धा पाच आकड्यात असते. तिथे स्वतःचे दुकान खरेदी करण्याचे स्वप्न सुद्धा सर्वसामान्य माणूस पाहू शकत नाही. सर्वसामान्यांच्या वाट्याला येणारा रोजगार म्हणजे फिरते व्यवसाय, रिक्षा किंवा जीप वाहतूक किंवा आपल्या शेतात पिकलेला माल तिथल्या व्यापाऱ्याला नेऊन विकणे. तीर्थक्षेत्री माल विकला म्हणून शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतात असेही काही दिसत नाही. 


४) अनेक ठिकाणी देवाला वाहिलेल्या नारळ, उदबत्ती, चादर इत्यादी गोष्टी पुन्हा बाहेरच्या दुकानात विक्रीस ठेवलेल्या आढळतात. ही सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे. आणि जनतेचा पैसा ठराविक लोकांच्याच घशात घालण्याचा प्रकार आहे.


५) तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भयंकर अस्वच्छता दिसून येते कोणतेही तीर्थक्षेत्र घ्या, विशेषतः यात्रेच्या काळात त्या ठिकाणी भयंकर अस्वच्छता वाढते. भाविक अगदी कुठेही शौचाला बसलेले आढळून येतील. काही तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रेच्या कालावधीत आणि नंतर प्रचंड दुर्गंधी पसरलेली असते. यात्रा नसतानाच्या काळातही बरीच अस्वच्छता असते. 


६) तिर्थक्षेत्रांवरील अर्थव्यवस्था ही सरळ सरळ जनतेची लूट व्यवस्था आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी महाग विकल्या जातात. २० रुपयांचा नारळ ४० रुपयांना, १५ रुपयांची पाण्याची बाटली २५ रुपयांना अशा प्रकारे सर्वच वस्तूंचे भाव वाढवले जातात. रिक्षा, हॉटेले, लॉज या सगळ्यांचेच भाव इतर ठिकाणांपेक्षा जास्त असतात. बाहेरचे व्यावसायिक लुटतातच; पण प्रार्थनास्थळाच्या आतील लोकही लुटतात. दर्शनासाठी, पूजेसाठी, कर्मकांडे, विधी करण्यासाठीचे दर ठरलेले असतात. या माध्यमांतून देवांचे दलाल लुटत असतात. आणि इथे लुटून घेण्यासाठी भाविक आपली दैनंदिन कामे, रोजगार बुडवून आलेले असतात. इथल्या काही शे लोकांना रोजगार देण्यासाठी लाखो (काही ठिकाणी करोडो) लोकांचा रोजगार बुडतो. काही शे लोकांचे पोट भरण्यासाठी लाखो (काही ठिकाणी करोडो) लोकांना लुटले जाते. 


७) अनेक लोक तीर्थक्षेत्राची वारी करण्यासाठी आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन जातात. त्यासाठी मुलाबाळांची शाळा बुडवतात. आणि हे प्रमाण प्रचंड आहे. खेड्यापाड्यातील मुलांना दर्जेदार शिक्षणाची आधीच वानवा आहे. पालकांमध्ये शिक्षणाबद्दल आस्था कमी आहे. त्यातच धार्मिक यात्रा, देवस्थानांचे विविध उत्सव यांच्या निमित्ताने मुलांच्या शिक्षणाची आबाळ होते. ही गोष्ट विकासाला पूर्णपणे मारक आहे. 


८) कोणत्याही तीर्थक्षेत्री जा, तिथे इतर व्यवसायांबरोबर काही अवैध व्यवसायही फोफावलेले दिसतात. यातील काही उघडपणे चालतात तर काही छुपेपणाने चालतात. दारू, जुगार, मटका, वेश्याव्यवसाय, चोरी यांना जणू तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अभयच मिळते. अवैध व्यवसाय तीर्थक्षेत्रांच्या आश्रयाने अमाप फोफावलेले दिसतात. 


९) तीर्थक्षेत्रांवर होणाऱ्या गर्दीमुळे व्यवस्थेवर प्रचंड ताण येतो. वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य, सुरक्षा यासाठीच्या यंत्रणेवर एकाच ठिकाणी झालेल्या गर्दीमुळे प्रचंड ताण येतो. आणि खर्चही प्रचंड येतो. खरे तर प्रशासकीय यंत्रणा देशविकासाच्या विधायक कामांसाठी वापरली जायला हवी. पण यंत्रणेची अर्धीअधिक ताकद धार्मिक उत्सव आणि तिर्थक्षेत्रे यांवरच खर्च होते. 


१०) ज्या देशातील लहान बालके सरकारी दवाखान्यात ऑक्सिजनविना तडफडून मरतात, त्या देशात पैसा प्रार्थनास्थळे बांधण्यासाठी खर्च व्हायला हवा की आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी खर्च व्हायला हवा? याच पद्धतीने जगातील उत्कृष्ट पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये भारतातील एकही विद्यापीठ नसताना देशाचा पैसा प्रार्थनास्थळांवर खर्च करायला हवा की शिक्षणावर खर्च करायला हवा? याचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. 


बरे, एवढे सगळे करून भाविकांच्या पदरी काय पडते? तीर्थयात्रा केल्याच्या समाधानापलीकडे काहीही मिळत नाही. मनोकामना पूर्ण होणे, देव पावणे, वगैरे अंधश्रद्धा आहेत. तीर्थयात्रा केल्याने दुष्काळ हटत नाही, प्रदूषण कमी होत नाही, भ्रष्टाचार कमी होत नाही, समाजातला द्वेष संपत नाही, आजारपणे जात नाही. लोकांच्या जीवनात कुठलाही सकारात्मक परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे कुणी प्रार्थनास्थळे बांधल्यामुळे रोजगार वाढत असल्याची टिमकी वाजवत असेल तर त्याला गुंगीतून बाहेर काढणे आवश्यक आहे.

जाता जाता एक खुलासा- वरील विवेचन सर्व धर्मांच्या प्रार्थनास्थळांना आणि तिर्थक्षेत्रांना लागू आहे.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा