बुधवार, ७ मे, २०२५

धारकऱ्याला पत्र




प्रिय धारकरी मित्रा, जय शिवराय!
आज तुझ्याशी संवाद साधायचा आहे. आज पर्यंत अनेक वेळा मनात विचार येऊन गेला की ज्यांना धारकरी म्हटले जाते ते लोक संभाजी भिडे सारख्या शिवद्रोही माणसाचे इतके भक्त कसे काय होऊ शकतात? कितीही अडाणी माणूस असला तरी त्याचा थोडा तरी कॉमनसेन्स जागा असतोच. चांगले काय, वाईट काय त्याला समजतेच. मग संभाजी भिडे सारख्या माणसाच्या मागे जाताना हा कॉमनसेन्स जातो कुठे? असा मला प्रश्न पडत होता. अनेक दिवसाच्या अभ्यासानंतर मेंदू हॅक करणे वगैरे गोष्टी मला समजल्या. तंत्रज्ञानामध्ये कॉम्प्युटर, मोबाईल, वेबसाईट हॅक करता येते, हे माहीत होते. पण माणसाचा मेंदू हॅक करता येतो हे माहीत नव्हते. पण हे अक्षरशः खरे आहे, हे अलीकडच्या काळात सिद्ध झाले आहे. याबाबत MKCL चे विवेक सावंत यांची मांडणी ऐकण्यासारखी आहे. पण ते जाऊ दे. तो खूप तात्विक आणि सैद्धांतिक भाग झाला. तो सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. पण दुसरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे तुम्हाला, म्हणजे धारकऱ्यांना सत्य कधीच सांगितले जात नाही. तुम्हाला वारंवार खोट्या गोष्टी सांगून तुम्हाला भडकवले जाते. माझ्या पाहण्यात असे अनेक लोक आहेत जे खूप सज्जन आणि साधे भोळे आहेत; पण भिडेच्या नादाला लागल्यापासून त्यांच्या तोंडी अतिशय घाण शिव्या येऊ लागल्या आहेत. चांगली माणसे इतक्यात खालच्या थराला जात असलेली पाहून मनात विचार आला की एकदा धारकऱ्यांशी संवाद साधावाच. तेव्हा खालील मुद्दे शांतपणे वाच, त्यावर विचार कर आणि तू तुझा निर्णय घे.
१) पहिली गोष्ट म्हणजे शिवप्रतिष्ठान ही संस्था शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालते. याचा अर्थ इथे शिवविचारानुसारच वर्तन हवे. स्त्रियांचा सन्मान हे शिवविचाराचे प्रमुख अंग आहे. आईवरून शिवी देणे हे शिवविचारात अजिबात बसत नाही. पुढच्या माणसावर कितीही राग असला तरी त्याच्या आईला वाईट बोलणे चुकीचे आहे. शिवाजी महाराजांनी शत्रूच्या स्त्रीचा सुद्धा सन्मान केला. मग धारकऱ्यांनी आपल्याच धर्मातील विरोधकांच्या (शत्रूच्या नव्हे) आईला घाण-घाण बोलणे योग्य आहे का? याचा विचार तूच कर.
२) जेम्स लेन नावाच्या एका परदेशी संशोधकाने भारतात येऊन शिवाजी महाराजांच्याबद्दल काही संशोधन करून एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकात असे लिहिले की 'शिवाजी महाराजांचा जैविक बाप दादोजी कोंडदेव आहे, असा विनोद पुण्याच्या रस्त्यांवर केला जातो.' असा विनोद पुण्याच्या रस्त्यांवर कुणीही कधीही ऐकलेला नव्हता. पण परदेशातून इथे आलेल्या संशोधकाला तो विनोद कुठे ऐकायला मिळाला? त्या परदेशी संशोधकाला माहिती देणारे लोक कोण होते? ते लोक कोण होते, याचा उल्लेख त्याच पुस्तकात आहे. ते लोक हिंदुत्ववादी विचारांचेच असावेत हा योगायोग नाही. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. अनेकांनी त्या जेम्स लेनचा निषेध केला. अनेकांनी आंदोलने केली. पण एका माणसाने त्याचा अजिबात निषेध केला नाही. आणि तो माणूस होता संभाजी भिडे. शिवाजी महाराजांच्या नावाने संघटना चालवणारा माणूस शिवाजी महाराजांची आणि जिजाऊंची बदनामी करणाऱ्या व्यक्तींचा साधा निषेधही करत नसेल तर त्यातून त्याची नियत साफ नाही हेच सिद्ध होते.
३) याच शिवप्रतिष्ठानने एक लाख लोकांच्या घरी शिवचरित्र पोहोचवण्याचा संकल्प केला. त्यासाठी महाराष्ट्रभरातून पैसे गोळा केले. आणि ते शिवचरित्र कोणते होते माहीत आहे का? जिजाऊंची बदनामी करणारे, जिजाऊ यांचा संबंध दादोजी कोंडदेवशी जोडणारे बाबा पुरंदरे लिखित 'राजा शिवछत्रपती' हे पुस्तक. योगायोग लक्षात घे. जेम्स लेनचा साधा निषेधही नाही. आणि जिजाऊंची बदनामी करणारे 'राजा शिवछत्रपती' हे पुस्तक मात्र एक लाख घरांमध्ये पोचवले. साधा कॉमनसेन्स असणारा माणूस देखील चिडून उठेल अशा या गोष्टी आहेत. ('राजा शिवछत्रपती' या पुस्तकातील जिजाऊंची बदनामी उघड करणारे 'पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर' हे डॉ.आ.ह. साळुंखे यांचे पुस्तक नक्की वाच.)
४) बरे, ह्या गोष्टी एक-दोनदाच घडल्यात असे आहे का? गेल्या वीसेक वर्षात शिवाजी महाराजांची बदनामी आणि अपमान करण्याचा प्रयत्न अनेकदा झाला. सुधांशू त्रिवेदी, श्रीपाद छिंदम, भगतसिंग कोश्यारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर या लोकांनी शिवाजी महाराजांचा अगदी खालच्या थराला जाऊन अपमान केला. पण संभाजी भिडेंनी यातील कुणालाही जाब विचारला नाही किंवा साधा निषेधही केला नाही. ही गोष्ट तू ध्यानात घ्यायला हवीस. जाता जाता आणखी एक गोष्ट लक्षात आली ती सांगतो.
शिवाजी महाराजांचा अपमान करणारे हे सर्व लोक भाजप किंवा RSS शी संबंधित कसे काय?
५) आपल्या संत परंपरेतले संत तुकाराम सर्व महाराष्ट्रीयांच्या हृदयात विराजमान आहेत. या संत तुकारामांचा सुद्धा अपमान संभाजी भिडेंनी केला. ते म्हणाले , "तुकारामापेक्षा मनू श्रेष्ठ होता." ज्या मनुने आपल्या गुलामीचा पाया रचला, त्या मनूला भिडे तुकारामांपेक्षा श्रेष्ठ मानतात. ही आपल्या तुकारामांची किंमत? सर्व धारकऱ्यांनी संभाजी भिडेला याचा जाब विचारायला हवा.

भावा विचार कर, आपली श्रद्धास्थाने असलेल्या शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, संत तुकाराम यांचा अपमान करणारा संभाजी भिडे आपला माणूस असू शकतो का? शिवप्रतिष्ठान काय आहे हे एकदा समजून घे. मेंढीचे कातडे पांघरून मेंढ्यांच्या कळपात घुसलेला लांडगा मेंढ्यांनी वेळीच ओळखला नाही तर मेंढ्यांना जीवानिशी जावे लागते. आपल्या बहुजनांनी पण शिवप्रेमाचे कातडे पांघरलेल्या शिवद्रोह्यांना ओळखले पाहिजे.
सांगण्यासारखे आणखी बरेच काही आहे. पण मुख्य गोष्टीच इथे सांगितल्या आहेत. माझा तुझ्यावर विश्वास आहे. हे वाचून तू नक्कीच विचार करशील.

तुझाच भाऊ
शिवरुद्र


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा