शुक्रवार, १८ एप्रिल, २०२५

या कोंडलेल्या वाफेचे काय करायचे?


         कुकरमध्ये प्रचंड वाफ कोंडली आणि त्या वाफेला बाहेर पडायची संधीच मिळाली नाही तर काय होईल? कुकरचा स्फोट होईल. अशीच स्फोटक परिस्थिती सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आहे. हे मी प्रत्येक गावात असलेल्या लग्न न झालेल्या  मुलांबद्दल लिहीत आहे. आज प्रत्येक गावात तिशी-चाळीशी ओलांडलेली आणि तरीही लग्न न झालेली शेकडो मुले सापडतील. एका गावात लग्न न झालेला एखाद-दुसरा माणूस असणे नॉर्मल म्हणता येईल. दीर्घकालीन आजारपण, मनोरुग्णता, अपंगत्व यामुळे गावात एक-दोन माणसे बिना लग्नाची असू शकतात. पण एका गावात शेकडो मुले बिना लग्नाची असणे हा आपल्या समाजाला रेड सिग्नल आहे. 

    आज-काल वयात येण्यापूर्वीच मुलांच्यामध्ये लैंगिक भावना जागृत झालेल्या दिसतात. टीव्ही, सिनेमे, मोबाईल यांमुळे वयात येण्यापूर्वीच प्रेम, सेक्स वगैरे गोष्टी मुलांच्या कानावर आलेल्या असतात. त्याबद्दल आकर्षणही निर्माण झालेले असते. त्यामुळे वयात आल्याबरोबर या सगळ्या भावना उफाळून येतात. तरीही सामाजिक बंधनांमुळे काही काळ या भावना दाबून ठेवल्या जातात. परंतु योग्य वेळी या भावनांना वाट मोकळी करून देणे आवश्यक असते. पण आज-काल योग्य वेळी मुलांची लग्न होतात कुठे? ज्या वयात ह्या भावना उफाळून येतात त्याच वयात या भावना तितक्याच क्रूरपणे दाबून टाकाव्या लागतात. दीर्घकाळ या भावना दाबून टाकल्या तर या भावनांचा स्फोट होऊ शकतो. हा स्फोट कोणत्याही रूपाने समोर येऊ शकतो. स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडणे, इतरांना इजा करणे, भांडणे करणे, स्त्रिया-मुलींची छेडछाड करणे, बलात्कार करणे, शिव्या देणे, आत्महत्या करणे अशा कोणत्याही प्रकारे या भावनांचा स्फोट होऊ शकतो. आणि या सगळ्याच गोष्टी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने भयंकर आहेत.

    नोकऱ्या नसल्यामुळे आणि शेतीला प्रतिष्ठा नसल्यामुळे अविवाहित राहिलेल्या आणि त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेल्या तरुणांचा एक गटच गावोगावी पाहायला मिळतो. कुठेतरी स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने कामाला जाऊन आलेल्या पैशांतून दारू पिऊन आपले फ्रस्ट्रेशन घालवण्याचा प्रयत्न ते करत असतात. पण नशा उतरल्यानंतर फ्रस्ट्रेशन सतावतच असते. त्यातच भावना चाळवणारे सिनेमे, मालिका त्यांच्या समोरच असतात. त्यांच्या समोरच त्यांचा वर्गमित्र बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला गेलेला असतो. तिथले फोटो तो सोशल मीडियावर टाकत असतो. या गोष्टी मनातून भयंकर त्रास देत असतात. कल्पना करा, कुठेतरी कामाला गेल्यावर यांच्या तावडीत एखादी स्त्री सापडली तर तिचे काय होईल? ते तरुण भले बलात्कारी मानसिकतेचे नसले; तरीही त्या स्त्रीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा उपद्रव त्यांच्याकडून नक्कीच होणार. वर्षानुवर्षे कोंडलेली वाफ अशावेळी स्फोटक पद्धतीने बाहेर पडण्याची खूप शक्यता असते. 

    काही धर्मांध संघटनांना दंगली घडवण्यासाठी रिकामे हात हवेच आहेत. डोक्यामध्ये फ्रस्ट्रेशन असलेले हे तरुण त्यांच्यासाठी आयतेच उपलब्ध होतील. आणि प्रचंड विध्वंस घडवणाऱ्या दंगली होतील.

     त्यामुळे समाजाने सावध होणे आवश्यक आहे. सावध व्हायचे म्हणजे केवळ स्त्रिया-मुलींना या तरुणांपासून दूर ठेवणे नव्हे. हा वरवरचा उपाय झाला. आणि तोही फारसा परिणामकारक नाही. समस्येचे मुळातूनच उच्चाटन व्हायला हवे. खाली काही उपाय सुचवत आहे. विचारी वाचक त्यामध्ये भर घालू शकतात, तसेच दुरुस्तीही सुचवू शकतात.

१) पहिला उपाय आहे रोजगाराचा प्रश्न सोडवणे. हा उपाय बहुतांशी शासनाच्या अखत्यारीतील आहे. शासनाने अशिक्षित, अल्पशिक्षित आणि शिक्षित तरुणांनाही रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा. खाजगीकरणाचे धोरण कमी करून सरकारी उद्योगांची संख्या वाढवायला हवी. कारण खासगी उद्योग त्यांच्या नफ्याला प्राधान्य देतात. त्यामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त काम करून घेण्यावर त्यांचा भर असतो. साहजिकच ते कमीत कमी नोकर भरती करतात. शासनाने भविष्यातील संकटाचा विचार करून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करावी.

२) गर्भपातावर कठोर कारवाई करणे. गेल्या वीस वर्षात गर्भलिंगनिदान चाचण्या आणि त्यानंतर गर्भपात या गोष्टींमुळे मुलींची संख्या प्रचंड कमी झाली आहे. मुलींची संख्या कमी झाल्यामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यामुळे गर्भलिंग निदान चाचण्या आणि गर्भपात करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. 

३) लग्न न झालेल्या मुलींनी स्वतःच्या अपेक्षा कमी करणे ही आवश्यक गोष्ट आहे. केवळ नोकरीवाला मुलगा पाहिजे या अपेक्षेतून वयाची तिशी ओलांडेपर्यंत अविवाहित राहिलेल्या मुलींची संख्याही बरीच मोठी आहे. या मुलींचे काउंसेलिंग केले पाहिजे. नोकरी हेच सर्वस्व नाही, शेतीमधून सुद्धा चांगले उत्पन्न मिळवता येते, ही गोष्ट त्यांना पटवून द्यायला हवी. त्यांना या अविवाहित मुलांशी लग्न करण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे.

४) चौथी गोष्ट समाज म्हणून आपल्याला कदाचित पटणार नाही; पण भविष्यातील विस्फोट टाळण्यासाठी ही गोष्ट करणे आवश्यक आहे. अविवाहित मुलांना 'मोकळे' होण्यासाठी प्रत्येक गावात काहीतरी सुविधा असायला हवी. साठलेली वाफ बाहेर पडण्यासाठी कुकरला शिट्टी असते. त्यातून थोडी थोडी वाफ बाहेर पडली तर कुकरचा स्फोट होणे टळते. तसेच या मुलांच्या आत साठलेली वाफ थोडी थोडी बाहेर टाकण्याचा काहीतरी मार्ग उपलब्ध असायला हवा. या मुलांनी स्वतःहून गावात एखाद्या महिलेशी/मुलीशी सूत जमवले तर त्याकडे कानाडोळा करायला हवा. त्यांची बदनामी करणे टाळायला हवे. अविवाहित मुला-मुलींनी एकमेकांशी प्रेमसंबंध जोडण्यात काहीही चूक नाही. विशेषतः वय वाढल्यानंतरही लग्न न झालेल्या तरुण-तरुणींना लग्नाशिवाय शरीरसंबंध करण्याची परवानगी असायला हवी. समाजाने ही परवानगी खुलेपणाने द्यायला हवी. असे संबंध ठेवणाऱ्या जोडप्यांना समाजाने कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ नये.


    वरील उपाय सोपे नसले तरी फारच अवघड किंवा अशक्य नक्कीच नाहीत. हे उपाय करता येण्यासारखे आहेत. समाजातील एक घटक म्हणून आपण स्वतः कोणता उपाय करू शकता, कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्याकडे एखादा उपाय असेल तर तोही नक्कीच सांगा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा