Sunday, September 27, 2020

कोरोना आणि अंधश्रद्धा

 भारतात कोरोनाने शिरकाव केला तेव्हाच निश्चित झाले होते की याबाबतच्या अंधश्रद्धाही लवकरच येणार. आणि तसेच झाले. लॉकडाऊन घोषित होतोय न होतोय तोवरच सोशल मिडियातून अमुक मंत्र म्हणा म्हणजे कोरोना होणार नाही, तमुक विधी करा म्हणजे कोरोना होणार नाही, अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होऊ लागले. अगदी शिकलेले लोक सुद्धा काहीही सांगू लागले. खरे तर हे आपल्यासाठी नवीन नाही. बाळाला साधा ताप आला तरी मीठ-मिरची उतरून टाकणारा आपला समाज कोरोनाच्या काळात नवीन अंधश्रद्धा तयार करणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. आम्ही पूर्वीपासून हेच करत आलोय. स्मॉलपॉक्स सारख्या आजाराला आमचा समाज ‘देवीचा आजार म्हणायचा. हा आमचा इतिहास आहे.  तो तथाकथित ‘देवीचा आजार आजार घालवायला कुठलीही देवी मदतीला आली नाही. शेवटी विज्ञानानेच ते काम केले. विज्ञानाने लस शोधून काढली आणि ‘देवीचा आजार जगातून नष्ट करून टाकला. कॉलरा, पटकी, नारू कित्येक आजार आले आणि गेले. गेल्या नाहीत तेवढ्या अंधश्रद्धा. विज्ञानाने कितीही प्रगती केली, शिक्षणाचा कितीही प्रसार झाला आणि अंधश्रद्धेने कितीही नुकसान झाले तरी आम्ही आमच्या अंधश्रद्धा सोडायला तयार नाही आहोत.  कोरोनाने हेच सिद्ध केले आहे.

आता हेच बघा ना डॉक्टर्स, शासन आणि प्रशासन ओरडून सांगत आहे की कशामुळे कोरोना होतो आणि कशामुळे होत नाही. तरीही याबाबत विविध अंधश्रद्धा जन्माला आल्याच. कमकुवत मनाच्या आणि अगतिक लोकांना आपण समजून घेऊ शकतो. परंतु स्वतःची पोळी भाजून घेऊ पाहणारे समाजातील काही बदमाष लोक मात्र निश्चित दोषी ठरतात. केवळ प्रसिद्धीसाठी आणि त्याचा फायदा आपल्या धंद्यासाठी व्हावा यासाठी ‘कोरोना तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाही.’ असली विधाने एक आयुर्वेदिक डॉक्टरच करत असेल तर अज्ञानी आणि अगतिक लोकांना का दोष द्यावा? पण पुढे जाऊन तो डॉक्टर स्वतःच कोरोनामुळे मृत्यू पावल्यावर तरी लोकांनी शहाणे व्हायला हवे ना. पण असे काही होताना दिसत नाही. इतकी जागृती करूनही कोरोनाबाबतच्या अनेक अंधश्रद्धांनी देशात जन्म घेतला आहे. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे काही महिलांनी कोरोना देवीची स्थापना केलीय. इतकेच नाही तर तिला प्रसन्न करण्यासाठी तिला कोंबड्या-बकऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो असे समोर आले आहे. कोरोना देवीची पूजा केल्यावर कोरोनाची बाधा होत नाही अशी तिथल्या महिलांची समजूत आहे. ही समजूत किती घातक आहे याची त्या महिलांना जाणीवही नाही. हे केवळ बार्शीतच नाही तर सगळ्या देशभर होत आहे. बिहारमध्ये काही महिलांनी कोरोना मैयाचा शोध लावला आहे. तिथेही असेच देवीला खुश करण्याचे अनेक विधी केले जात आहेत. झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी चारशे बकऱ्यांचा बळी दिला आहे. कर्नाटकात बेळगाव परिसरात अमावास्येच्या रात्री जो झोपेल तो कायमचा झोपेल अशी अंधश्रद्धा पसरली. त्यामुळे हजारो लोकांनी रात्र जागून काढली. सोलापुरातील काही पुरोहितांनी कोरोनाचा प्रसार थांबवा म्हणून मृत्युंजय मंत्राचा जप चालू केला. इतके करूनही कोरोनाचा प्रसार थांबला नाहीच. कसा थांबेल? अशा गोष्टींनी आजार थांबले असते तर डॉक्टरांची गरज काय होती?

कोरोना होऊ नये म्हणून कोणी यज्ञ करण्याचा सल्ला देत आहे, कोणी नामस्मरण करण्याचा सल्ला देत आहे. कोणी गंडे-दोरे आणि ताईत बांधण्याचा सल्ला देत आहे. तर कुठे कणकेचे दिवे लावण्याचा प्रकार घडत आहे. कोरोनावाले बाबा सुद्धा जाहिरातींमधून दिसू लागले. कटकमध्ये तर एका पुजाऱ्याने कोरोना घालवण्यासाठी नरबळी दिल्याची घटना घडली. त्या पुजाऱ्याने कोरोनाचे संकट टळावे म्हणून एका व्यक्तीचा बळी देऊन त्याचे मुंडके ब्राम्हणी देवीला अर्पण केले. भिडे गुरुजींनी तर गाईचे तूप आणि गोमुत्राने कोरोना बरा होतो असे सांगितले. हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी तर गोमुत्राबरोबर शेणही खाण्याचा सल्ला दिला आहे. अंधश्रद्धेची आग अशी भडकत असताना काही राजकारणी लोक सुद्धा या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. ‘पापड खा आणि कोरोना बरा करा असा सल्ला केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिला. त्यावेळी हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. लोकांना पापड खाऊन कोरोना बरा करण्याचा सल्ला देणारे हे मंत्रीमहोदय स्वतःला कोरोनाची बाधा झाल्यावर मात्र एम्स रुग्णालयात दाखल झाले. म्हणजे जनता कोरोनाने मेली तरी चालेल अशीच त्यांची भावना नाही का? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना मुक्तीसाठी हनुमानाला ५१ मास्क अर्पण केले. मुख्यमंत्र्यानेच अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले तर जनता दुसरे काय करणार?

गाडगेबाबासारख्या संताने रोगराई पळवण्यासाठी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तो आचरणात आणायचे सोडून आपले लोक अंधश्रद्धा, देव-देवता आणि कर्मकांडातच गुंतून राहिले ही या देशाची मोठी शोकांतिका आहे. तरी एक चांगली गोष्ट घडत आहे. या सगळ्या गोष्टींबाबत जनजागृती करण्याचे काम इथलेच काही लोक करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना तर यात खूप चांगले योगदान देत आहेत. समाजातील जाणत्या आणि कर्त्या लोकांनी अशा प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवे.

शेवटी शासन, प्रशासन, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि सुजाण नागरिक यांच्या प्रयत्नातून आपण कोरोनाचे संकट आपण निश्चित परतवून लावू असा आशावाद मी व्यक्त करतो आणि थांबतो.

Monday, July 27, 2020

पाण्याच्या वापराबाबत कंजूषपणाच हवा

  माझ्या पाहण्यातील एक गाव. एकेकाळी पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होते. दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीच्या पाण्यावर चालणारी सिंचन योजना कार्यान्वित झाली आणि परिसरात पाणी आले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. पडीक जमिनी लागवडीखाली यायला लागल्या. गावाच्या भाळी असलेला दुष्काळ कायमचा मिटला. पाण्यासाठी या गावाने खूप सोसले होते. पाणी घेऊन येणाऱ्या टँकरची तासंतास वाट पाहिलेल्या लोकांचे हे गाव. रात्री-अपरात्री कधीही टँकर आला तर लोकांची पाणी घेण्यासाठी झुंबड उडायची. टँकरच्या पाण्यासाठी भांडणे व्हायची. पण या दोन-तीन वर्षात गावाचे सगळे रूपच बदलून गेले. गावाच्या चारी बाजूला हिरवळ नांदू लागली. पण याबरोबरच पाण्याची उधळपट्टी ही वाढू लागली. आधी पुरवून पुरवून पाणी वापरणारे लोक आता वारेमाप पाणी उधळताना दिसू लागले. गावातील एका व्यक्तीला सहज म्हणालो, "लोक पाणी असे वाया घालवतात ते योग्य नाही." तर तो म्हणाला, "जाऊ दे ना वाया. भरपूर पाणी आहे. थोडे वाया गेले तर काय बिघडते?"
   दुष्काळातून नुकत्याच सु काळात आलेल्या गावाची ही अवस्था तर ज्यांच्याकडे पूर्वीपासूनच भरपूर पाणी आहे, जे नदीकाठाला राहतात, त्या लोकांची मानसिकता काय असेल याचा विचार न केलेलाच बरा.
   खरे तर पाणी ही अतिशय मौल्यवान गोष्ट आहे. पाण्याचा कितीही सुकाळ आला तरी पाण्याचा वापर काटकसरीनेच करायला हवा, हे आमच्या लोकांना कोणीतरी सांगायला हवे. आपल्या भागात पावसाचे प्रमाण मुळातच कमी आहे, हे जणू काही लोक विसरूनच गेले आहेत. आता जरी आपल्याकडे पाणी आले असले तरी ते पाणी येण्यासाठी हजारो युनिट्स वीज खर्च करावी लागली आहे. (आणि अजूनही वीज खर्च केल्याशिवाय पाणी आपल्याकडे येत नाही.) लाखो लिटर्स पेट्रोल-डिझेल खर्च करावे लागले आहे. हजारो झाडे तोडावी लागली आहेत. याचे भान लोकांनी ठेवायला हवे. आपण जरी नदीकाठाला राहत असाल तरी तुमच्या घरापर्यंत आणि शेतीपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी वीज खर्च करावी लागतेच. त्यामुळे आपण पाणी वाया घालवल्यास वीज आणि पाणी या दोन्हींचीही उधळपट्टी होते. म्हणून पाण्याची उपलब्धता कितीही वाढली, तरी पाण्याचा उपयोग काटकसरीने करायला हवा. नव्हे पाण्याच्या बाबतीत तर कंजूषपणाच करायला हवा. 

Thursday, July 23, 2020

सापाबद्दल तुम्ही ऐकलेल्या या गोष्टी खोट्या आहेत


   आपण नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या देशातील कृषी संस्कृतीच्या दृष्टीने नागपंचमीचा सण महत्त्वाचा आहे. परंतु त्याच वेळी साप दिसला रे दिसला तो मारून टाकण्याची प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये दिसून येते. सापाबद्दल प्रचंड अज्ञान आणि अंधश्रद्धा दिसून येतात. अनेक गैरसमज दिसून येतात. या लेखामध्ये सापाबद्दलच्या या अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
१) सापाबद्दल संपूर्ण भारतात आढळणारा आणि चित्रपट सृष्टीने मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलेला गैरसमज म्हणजे साप डूख धरतो. सिनेमामध्ये काहीही दाखवले तरी आपण मनाशी खूणगाठ बांधा की साप कधीही डूख धरत नाही. सापाची कोणतीही जात डूख धरत नाही. सापाचा मेंदू इतर प्राण्यांच्या मानाने अतिशय अविकसित असा मेंदू आहे. तो इतका अविकसित आहे की तो माणसाचा चेहरा लक्षातच ठेवू शकत नाही. तसेच सापाची दृष्टीही कमजोर असते. विशेषतः कातणीला आलेल्या सापाची दृष्टी तर खूपच कमजोर असते. त्यामुळे सापाला व्यक्तीचा चेहराही स्पष्टपणे दिसत नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या लक्षात येईल की साप डूख धरू शकत नाही.
२) सापाबद्दल आढळणारा दुसरा गैरसमज म्हणजे साप दूध पितो. गारुडी लोक आणि चित्रपटांनी हा गैरसमज वाढीस लावला आहे. साप हा मांसाहारी प्राणी आहे. दूध हे सापाचे अन्न नाही. उलट दूध हे सापासाठी विष ठरू शकते. कारण दूध सापाला पचत नाही. त्यामुळे साप दूध पितो हा गैरसमज आहे हे लक्षात घ्या. काही गारुडी लोक सापाला खूप दिवस पाणी देत नाहीत. त्यामुळे तहानलेला साप समोर दूध ठेवल्यास पाणी समजून पितो. परंतु एरव्ही साप दूध पीत नाही.
३) साप अमर असतो असाही एक गैरसमज आहे. साप म्हातारा झाला की कात टाकतो आणि आणि तो पुन्हा तरुण होतो, त्यामुळे तो मरत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु तसे काही नाही. पृथ्वीवरील इतर सजीवांप्रमाणे सापही मर्त्य प्राणी आहे. सापांच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे आयुष्यमान आहे.
४) नागा जवळ नागमणी असतो असे काही चित्रपट, काही फेक व्हिडीओ आणि अनेक चर्चांमधून पाहायला आणि ऐकायला मिळते. परंतु नागमणी असणारा साप नसतोच. अनेक सर्प तज्ञांनी सापांवर लक्ष ठेवून, वेगवेगळ्या पद्धतीने सापांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे की कोणत्याही नागा जवळ नागमणी नसतो.
५) सापाच्या अंगावर केस असतात असे काहीजण सांगतात. हेही खोटी आहे. साप हा सस्तन प्राणी नाही. तो सरपटणारा प्राणी आहे. जगामध्ये केस असणारा साप कुठेही नाही. गारुडी लोक सापाच्या त्वचेमध्ये इतर प्राण्यांचे केस सुईने रोवतात आणि लोकांना केस असणारा साप आहे असे सांगतात.
६) साप धनाचे रक्षण करतो असे सांगितले जाते. यातही काही तथ्य नाही. पूर्वीच्या काळी लोक धनसंपत्ती घरांमध्ये, जुन्या वाड्यांमध्ये पुरून ठेवायचे. पुढे जुनी घरे किंवा वाडे यांची पडझड झाल्यानंतर तिथे उंदीर घुशी यांचे प्रमाण वाढते आणि त्यांना खाण्यासाठी तिथे सापही येतात. अशा घराच्या ठिकाणी नवीन बांधकाम वगैरे करताना साप आणि पुरून ठेवलेले धन एकत्र सापडू शकते. याचा अर्थ साप धनाचे रक्षण करत होता, असा नाही.
७) मेलेला साप रॉकेलने जिवंत होतो असे सांगितले जाते. हाही गैरसमज आहे. साप मारताना त्याचे डोके ठेचले जाते आणि असा साप मेला तरी त्याच्या बाकीच्या शरीरातील पेशी जिवंत असतात. त्या लगेच मरत नाहीत. त्यामुळे सापावर रॉकेल ओतल्यानंतर सापाचे शरीर हालचाल करते. यालाच लोक साप जिवंत झाला असे म्हणतात. परंतु मेलेला साप जिवंत होणे सर्वस्वी अशक्य आहे.
८) सापाचे दोन तुकडे केल्यास सापाचे मुंडके मारणाऱ्याचा माग काढत राहते आणि मारणाऱ्या व्यक्तीचा बदला घेते, असा एक गैरसमज आहे. अर्थातच हे चुकीचे आहे. साप मेल्यानंतर सर्व संपते. सापाचे आयुष्य संपून जाते. मुंडकेही निर्जीव होऊन जाते.
९) मंत्राने सापाचे विष उतरते, हा एक मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये रुजून बसलेला आहे. या गैरसमजामुळे काही लोक विषारी साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मंत्रतंत्र करत बसतात आणि हकनाक व्यक्तीचा जीव घालवून बसतात. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार मंत्राने विष उतरवणे हा गुन्हा आहे, हे इथे लक्षात घ्यावे.
१०) पूजेने साप प्रसन्न होतो असे लोक मानतात. हाही गैरसमज आहे. पूजेचा अर्थ समजण्याइतकी बुद्धी सापाला नाही. त्यामुळे तो प्रसन्न होण्याचा प्रश्नच नाही. काही लोक तर नागपंचमीच्या दिवशी सापाला नवस बोलतात. नवस वगैरे अंधश्रद्धा आहेत हे आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. 

   सापाबद्दल आणखीही काही गैरसमज आणि अंधश्रद्धा देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत. सगळ्याच इथे सांगणे शक्य नाही. पण आपणाला जेवढे माहीत आहे तेवढे लोकांना सांगणे आणि त्यांचे गैरसमज दूर करणे आपले काम आहे. आपणही हा लेख शेअर करून हे काम करावे अशी अपेक्षा आहे.

Wednesday, July 8, 2020

संपूर्ण वाचा, भयानक आहे सगळं!


१. भालचंद्र गायकवाड हे रुग्ण ठाणे महापालिकेच्या नव्याने बांधलेल्या ग्लोबल कोविड हॉस्पिटलमधून बेपत्ता झाल्याचे घोषित केले जाते.
२. गायकवाड यांचे वय ७१, पँरालेसिसचा पेशंट पळून कसा जाणार?
३. घरच्यांच्या ही गडबड आहे लक्षात येते. देवेंद्र फडणवीस यांना नातेवाईक भेटतात. फडणवीस याची जबाबदारी किरीट सोमैया यांना देतात. सोमैया २ दिवस सैरभैर पळून पोलीस ठाण्यात हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा दाखल करायला लावतात.
४. हॉस्पिटल प्रशासन जागे होते व सांगितले जाते की ३ तारखेलाच ते मृत झालेत आणि त्यांचा मृतदेह दुसऱ्या कोणाला तरी दिला गेला.
५. कोणाला दिला गेला याचा शोध होतो. तर सोनवणे कुटुंबियाना ते सोनवणे काका आहेत म्हणून मृतदेह दिला जातो. बॉडी बॅग्ज  पारदर्शक नसल्यामुळे सोनवणे काकांचा मृतदेह बघता येत नाही. आणि कारोना मुळे बॉडीला हात लावता येत नसल्यामुळे तसेच अंत्यसंस्कार केले जातात.
६. आता दुसऱ्या दिवशी सोनवणे फॅमिली घरी क्वारंटाईन केली जाते आणि अचानक खऱ्या सोनवणे काकांचा घरी फोन येतो, मला बरं वाटतंय उद्या डिस्चार्ज मिळतोय. घरचे शॉक होतात, काल आपण जाळले कोणाला?
७. इकडे तोपर्यंत सोमैया धडपडून शोध लावतात की जो मृतदेह जाळला गेला तो तर गायकवाड यांचा होता, ज्या गायकवाडांना हॉस्पिटल ने बेपत्ता घोषित केलं होत.
८. सोनवणे काका आज घरी जातात,
स्टोरी इथेच संपत नाही.
९. सोनवणे काका जे मृत म्हणून आधी घोषित झाले, त्यांची ट्रीटमेंट त्यांच्या बेडवर मोरे नावाने चालू होती, हे त्यांना डिस्चार्ज घेताना पेपर बघून समजले.
१०. आणि मोरे तर ५ दिवसांपूर्वी बरे होऊन घरी गेलेत.

भयानक आहे सगळे, घरी रहा, काळजी घ्या...


Saturday, July 4, 2020

गुरुपौर्णिमेच्या सदिच्छा


      आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूचे महात्म्य सांगणाऱ्या पोस्ट पाठवण्यापूर्वी जरा आठवूया शाळेत असताना आपल्या गुरूने दिलेली शिकवण.
१) कधीतरी गुरूने सांगितले होते कि आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. आज आपण ती संपत्ती जपतोय का? योग्य आहार-विहाराबरोबर व्यायाम करतोय का?
२) कधीतरी एकदा गुरूने सांगितले होते निर्व्यसनी असण्याचे महत्त्व. सिगारेट, दारू, तंबाखू, गुटखा यांचे व्यसन असणे ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे. आपण आज व्यसनांपासून दूर आहोत का? गुरूने दिलेली निर्व्यसनी राहण्याची शिकवण आज आपण आचरणात आणतोय का?
३) कधीतरी गुरुजींनी सांगितले होते सत्य निष्ठेचे महत्व. आज आपण सत्याने वागतोय का? बोलताना जास्तीत जास्त खरे बोलण्याचा प्रयत्न करतोय का?
४) कधीतरी एकदा गुरूने सांगितले होते भ्रष्टाचार, अनाचार, काळा पैसा ही या देशाला लागलेली कीड आहे. आज आपण वैयक्तिक जीवनात भ्रष्टाचारापासून दूर आहोत का?  भ्रष्टाचार करण्याची संधी असतानाही भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतोय का?
५) गुरूने एकदा असे सांगितले असेल 'जनसेवा हीच ईश्वरसेवा.' आज आम्ही जनसेवेत ईश्वराला पाहतोय का?

वरील प्रश्नांची उत्तरे 'होय' असतील तर तुम्ही खऱ्या अर्थाने आज गुरुपौर्णिमा साजरी करत आहात. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि गुरुपौर्णिमेच्या खूप खूप सदिच्छा!
💐💐💐

शाकाहार योग्य की मांसाहार?

       
हा प्रश्न तसा खूप जुना आहे. काहीजण भूतदयेच्या अंगाने हा प्रश्न उपस्थित करतात तर काहीजण नैतिकतेच्या अंगाने. तर काहीजण धार्मिकतेच्या अंगाने याकडे बघतात. प्रत्येकाचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे. 
         विचारी किंवा विवेकी माणसाला धार्मिकतेच्या बाजूने विचारलेला प्रश्न अस्वस्थ करत नाही. कारण धार्मिक मते ही मुळातच बहुतांशी अविवेकी असतात. त्यामुळे विवेकी माणूस धार्मिकतेच्या अंगाने विचारलेल्या प्रश्नांना भिक घालत नाही. परंतु भूतदयेच्या किंवा नैतिकतेच्या अंगाने विचारलेले प्रश्न विवेकी माणसाला अस्वस्थ करतात, विचारांला प्रवृत्त करतात. त्यात बहुतांशी विवेकी लोक मांसाहार करणारे आहेत. (अविवेकी लोकांमध्ये सुद्धा मांसाहार करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त आहे.) त्यामुळे आपल्याकडून अविवेकी कृत्य घडत असेल तर विवेकी लोक स्वतःला दोषी मानतात. यातूनच मनात वैचारिक द्वंद्वाला सुरुवात होते. 
        मी स्वतःला विवेकी मानत नाही. परंतु विवेकाच्या बाजूचा मानतो. मी स्वतःला विवेकाच्या वाटेवरचा वाटसरू मानतो. मी अजूनही पूर्णपणे विवेकी झालो नाही. मी तसा होईन की नाही माहित नाही. परंतु मी विवेकी होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे हे मात्र नक्की. त्यामुळेच मला या प्रश्नाने अस्वस्थ केले, विचार करायला भाग पाडले. हे विचार करणे ही सुद्धा एक प्रक्रिया होती. वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या वेळी हा प्रश्न मनात उभा राहिला. आणि वेगवेगळ्या प्रसंगी मी यावर विचार केला. कधी मटन आणायला गेलो असताना, कधी सिनेमा बघताना, कधी सोशल मिडीयावर व्हिडीओमध्ये वेगेवेगळ्या प्राण्यांना शिकारताना पाहताना, कधी वाचन करताना, तर कधी पाळलेल्या प्राण्यांना खाऊ-पिऊ घालताना, त्यांना गोंजारताना या प्रश्नावर विचार केला. कधी कधी फक्त निवांत असतानाही यावर विचार केला. या विचारमंथनातून जे निर्माण झाले ते शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.
          भूतदयेच्या दृष्टीने विचार केला तर प्रत्येक जीवाला स्वतःचा जीव प्यारा आहे. प्रत्येक प्राण्याला स्वतःचे जीवन जगण्याचा अधिकार निसर्गाने दिलेला आहे.  प्रत्येक सजीव जीवावरचे संकट दिसले की त्यापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतो. स्वतःचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. ही निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेली उपजत प्रवृत्ती आहे. त्यामुळे प्रत्येक जीवाचे मोल आहेच. पण निसर्गानेच यातल्या कित्येक जीवांचा हा जगण्याचा अधिकार सुद्धा मर्यादित केलेला आहे. निसर्गात असे कित्येक प्राणी आहेत की जे केवळ दुसऱ्या प्राण्यांना खाऊनच जिवंत राहू शकतात. त्यामुळे भक्षकाचे भक्ष्य असणाऱ्या प्राण्यांना कितीही स्वतःचे जीवन महत्वाचे वाटले तरी निसर्गाने त्याचा जगण्याचा अधिकारच मर्यादित केला आहे. त्यामुळे हे लक्षात घेतले पाहिजे की भूतदया हा निसर्गाचा विषय नाही. त्याच्या दृष्टीने भक्षक आणि भक्ष्य दोन्हींचे अस्तित्व टिकणे महत्वाचे आहे. भूतदया हा विषय मानवाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. कारण मानवच विचार करू शकतो. त्यालाच अनुकंपा, दया वगैरेंचे महत्त्व वाटते. 
          मांसाहारी प्राण्यांचे एक ठीक आहे. पण माणसाने प्राण्यांना खावे का? माणसासारख्या विचारी प्राण्याने तरी इतर प्राण्यांचा जगण्याचा अधिकार का नाकारावा? मांसाहारी प्राणी निसर्गतःच मांसाहारी आहेत. माणूस तसा आहे का? या प्रश्नाचा जरा शोध घेतला तर समजते की माणूस सुद्धा निसर्गतः मिश्राहारी आहे. पृथ्वीतलावर जन्माला आल्यापासून माणूस मांसाहार करत आला आहे. काही कीटकांपासून मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत अनेक जीवांना माणूस हा माणूस नव्हता तेव्हापासून खात आला आहे. जंगलात वणव्यामध्ये होरपळून मरण पावलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ल्यानंर मानवाला भाजलेले मांस जास्त चवदार लागते याचा शोध लागला. आणि नंतर मानवाने मांस आणि इतर पदार्थ सुद्धा भाजून खायला सुरुवात केली असे आपण शाळेत सुद्धा वाचले आहे. याचा अर्थच असा की मानव हा सुरुवातीपासूनच मिश्राहारी प्राणी आहे. मानवाला जवळचे असलेले माकडासारखे इतर काही प्राणी सुद्धा मिश्राहारी आहेत. जगातील प्राचीन वाङ्मयात सुद्धा माणसाच्या मांसभक्षणाची कित्येक वर्णने आली आहेत. उत्खननातील काही पुरावे सुद्धा माणसाच्या मांसभक्षणाची साक्ष देतात. म्हणजे माणूस केवळ शाकाहारी कधीच नव्हता. 
         दुसरा मुद्दा असा आहे की ज्या प्राण्यांना माणूस खातो, त्या प्राण्यांना तो वाढवतोही. हेच प्राणी नैसर्गिक अवस्थेत जंगलात भटकत असते तर त्यांना इतके आयुष्य लाभले असते का? जंगलात फिरणारी शेळी पाच वर्षे जगू शकली असती का? आज मानवाच्या आश्रयाखाली सरासरी सात ते दहा वर्षे शेळीचे आयुष्यमान असू शकेल. जंगलात हत्ती, वाघ, सिंह हे मोठे प्राणी म्हातारे होऊन मेलेले दिसतील. पण हरीण किंवा इतर छोटे प्राणी म्हातारे होऊन मेल्याचे दिसत नाही. याचे कारण यातील बहुतांशी प्राणी म्हातारे होण्यापूर्वीच शिकार झालेले असतात. माणूस सध्या मांसाहारासाठी जोपासत असलेले प्राणी जंगलात जगले असते त्यापेक्षा जास्त काळ माणसाच्या आश्रयाने जगत आहेत. म्हणजे त्यांना खाणारा माणूस त्यांचे आयुष्य कमी करत नाही तर उलट त्यांचे आयुष्य वाढवत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जंगलात या प्राण्यांना सतत भीतीखाली जगावे लागले असते. हेच प्राणी मानवाच्या आश्रयाखाली जेवढे आयुष्य जगत आहेत ते निर्धास्तपणे जगत आहेत. हे केवळ माणूस त्यांना खात असल्यामुळेच शक्य झाले आहे असे मला वाटते. माणूस या प्राण्यांना खात नसता तर त्यांना जंगलातच राहावे लागले असते, भीतीच्या छायेखालीच जगावे लागले असते आणि खूप कमी वयात दुसऱ्या कुठल्यातरी प्राण्याच्या हल्ल्यात त्यांना ठार व्हावे लागले असते. कारण मानवाने पाळलेले हे प्राणी निसर्गातील अतिशय दुर्बल प्राणी आहेत. 
       इथे मला वाटते भूतदया आणि नैतिकता या दोन्ही गोष्टी निकालात निघतात. माणूस हा मुळातच स्वतःचे जीवन अधिक रोचक, मोहक करणारा प्राणी आहे. पण या नादात त्याने निसर्गाचाच विध्वंस करू नये ही अपेक्षा रास्त आहे, यावर दुमत असू नये.



Friday, March 27, 2020

देव कधी मदतीला येणार?


'देवदर्शनाला जाताना गाडीला अपघात: इतके लोक ठार आणि इतके लोक जखमी, देवदर्शनाहून परतताना अपघात होऊन इतके भाविक ठार आणि इतके जखमी'
अशा बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. पण त्या बातम्या वाचून आपण तिथेच सोडून देतो. त्यावर विचार खूप कमी करतो. आता बातमी वाचली 'इस्लामपूरमध्ये हज यात्रेवरून आलेल्या कुटुंबाला कोरोनाचा संसर्ग'. इतकेच नाही तर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर वीसेक लोकांनाही संसर्ग झाला आहे. ही आतापर्यंत उघड झालेली संख्या आहे. ही संख्या वाढतच जाणार आहे.
मला प्रश्न पडतो, की जे भक्त मोठ्या भक्तिभावाने देवाच्या दर्शनाला गेले त्यांना देवाने का वाचवले नाही? ज्यांनी आयुष्यभर देवाचे भजन, पूजन, नामस्मरण आणि बरेच काही केले त्या भाविकांना वाचवण्यासाठी देव का पुढे आला नाही? आणि महत्वाचे म्हणजे हे वारंवार घडले आहे. अगदी इतिहासात बघितले तरी आपणाला दिसेल की कोणत्याही संकटाच्या प्रसंगी कोणताही देव मानवाच्या मदतीला आला नाही. अनेक साथीचे रोग आले. लोकांनी अनेक पूजापाठ आणि इतर अनेक प्रकार केले. पण एकाही देवाला साथीचे रोग घालवता आले नाहीत. देव उघड्या डोळ्यांनी आपल्याच भक्तांचे मृत्यू होताना बघत राहिले. साथीचे रोग आटोक्यात आणले शास्त्रज्ञांनी. त्यांनी वेगवेगळ्या रोगांवर लसी शोधून काढल्या आणि त्यामुळे काही रोग आटोक्यात आले तर काही चक्क नामशेष झाले.
आपल्या देशात तर देवांची महागर्दी आहे. आणि ९९% लोक देवभोळे. पण तरीही आमचा देश मागासच राहिला. अनेकांनी आमच्या देशावर आक्रमणे केली. देश लुटला, जनतेवर अत्याचार केले, देशाला गुलाम केले. पण आमचे देव मात्र ढिम्मच राहिले. कोणताही देव मदतीला आला नाही. परकीय आक्रमणे, रोगांच्या साथी, नसर्गिक आपत्ती यांमुळे कित्येक स्त्रिया विधवा झाल्या, कित्येक आयांना स्वतःच्या मुलांचे मृत्यू उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. पण आमचे देव भक्तासाठी जराही धावले नाहीत. देशातील ९९% जनतेने केलेल्या भक्तीचा काय उपयोग झाला?
२०१३ साली केदारनाथ येथे पूर येऊन संपूर्ण केदारनाथ गाव उध्वस्त झाले. करोडो रुपयांची हानी झालीच, पण ५०००पेक्षा जास्त लोक मरण पावले. पण केदारनाथ फक्त बघत राहिला. त्याने काहीही केले नाही. भक्त  पुराच्या पाण्यातून वाहून जात होते आणि केदारनाथ एका ठिकाणी स्थिर होता. मोठ्या श्रद्धेने तिथे गेलेल्या भाविकांना काय मिळाले? मृत्यू मिळाला त्यांना.  पण आम्ही मात्र केदारनाथ मंदिर पुरातूनन कसे वाचले याचीच चर्चा करत राहिलो. भक्त का मेले याची चर्चा केलीच नाही.

याच अध्यात्मिक देशात हजारो वर्षे दलितांवर अनन्वित अत्याचार होत राहिले. देवाने काहीच केले नाही. निष्पाप बालिकांवर बलात्कार झाले. देवाने काहीच केले नाही. अगदी मंदिरात सुद्धा बलात्कार झाले. देवाला त्या बालिकांचे आवाज ऐकू आले नाहीत. याच देशात राजकारणी लोक दिवसा-ढवळ्या कायदेशीर-बेकायदेशीर दरोडे घालत आहेत. बिनदिक्कत खोटे बोलत आहेत. देव त्यांचे काहीही वाकडे करत नाही. सगळी पापे करून ते अगदी धार्मिक मार्गाने पापक्षालन करून घेऊन नवी पापे करायला तयार होत आहेत. आणि आमचा देव? तो फक्त म्हणत आहे 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.' अरे किती दिवस? किती दिवस पाठीशी राहणार आहेस? कधीतरी समोर ये ना. भक्तांचे रक्षण कर ना. पण तो समोर येतच नाही. भक्तांचे रक्षण करतच नाही.
आता हेच बघा ना. आता कोरोनाचे भयानक संकट मानवजातीसमोर उभे ठाकले आहे. पण इथेही कोणत्याही देवाची भक्ती, पूजापाठ कामाला येत नाही. भक्त देवाकडे सगळ्या समस्यांची उत्तरे आहेत असे सांगतात. पण खुद्द भक्त समस्यांनी हैराण असताना सुद्धा देव त्याला वाचवायला येत नाही. भारतातील ३३ कोटी देव, मुस्लिमांचा अल्ला, ख्रिश्चनांचा गॉड यांपैकी कोणीही आपल्या भक्तांसाठी धावून यायला तयार नाही. कोणीही चमत्कार दाखवायला तयार नाही. ज्यांच्यासाठी आम्ही एकमेकांची डोकी फोडायला मागेपुढे पाहिले नाही, ज्यांच्यासाठी आम्ही अनेकांचे मुडदे पाडले, ते देव, गॉड, अल्ला, आणखी कुणी याच पद्धतीचा प्रेषित, देवदूत, बाबा-बुवा मदतीला धावला नाही. मदतीला धावत आहेत ती फक्त माणसे आणि माणसांनी शोधलेले विज्ञान. ज्याने 'माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत' असा दावा केला त्याने मैदानातून पळ काढला. आणि ज्याने 'मला आतापर्यंत इतकेच समजले आहे. यापुढील गोष्टी मला माहीत नाहीत. प्रयत्नांती त्या माहीत होऊ शकतील' अशी नम्र भूमिका घेतली ते विज्ञान मात्र चिकाटीने या संकटाला भिडत आहे. औषधाचा शोध घेत आहे.
आणि तरीही जगभरतील भक्त लोक म्हणत आहेत, जिथे विज्ञान संपते तिथून अध्यात्म सुरू होते.
ही मानसिक गुलामगिरी कधी संपणार?

Saturday, March 21, 2020

मंदबुद्धी भक्त


भक्ती तुम्हाला कोणता मूर्खपणा करायला लावेल ते सांगता येणार नाही. सध्या मोदीभक्त भक्तीत इतके बुडून गेले आहेत की त्यांना मेंदू आहे की नाही अशी शंका यावी. आज हा लेख लिहायला निमित्त ठरली ती सोशल मीडियावर 
'#मोदीजी_मला_अभिमान_वाटतो_तुमचा'
या शीर्षकाची  व्हायरल होत असलेली एक पोस्ट. ही पोस्ट उपहासात्मक आहे. त्यात मोदींनी २२ मार्चला जो जनता कर्फ्यू घोषित केला आहे आणि त्यानिमित्ताने जो टाळ्या वाजवण्याचा सल्ला दिला आहे, त्याची टर उडवली आहे. अगदी मोदींची इज्जतच काढली आहे. त्यामुळे मोदीविरोधकांनी ही पोस्ट पसरवणे समजू शकते. पण भक्तांची गोष्टच वेगळी. ज्या पोस्टमध्ये आपल्या  नेत्याची इज्जत काढली आहे तीच पोस्ट भक्त मंडळी मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. त्यामुळे माझ्यासारख्यांचे खूप मनोरंजन झाले.

हे काही पहिलेच उदाहरण नाही. यापूर्वीही असे झाले आहे.  तर अशी असतात ही भक्त मंडळी. भक्तीच्या नशेत पूर्णपणे बुडालेली. स्वतःच्या मेंदूचा वापर न करणारी. 

पण  याची काळजी वाटतेय. कारण अशाच मंदबुद्धी भक्तांच्या जोरावर सरकार समाजविघातक निर्णय देशावर थोपत आहे. सरकार चुकीचे निर्णय घेते. आणि भक्त मंडळींना तयार मजकूर, प्रतिमा आणि व्हिडीओज पुरवते. आणि मग भक्त मंडळी सुरू होतात. त्यांना आपण कोणत्या कुकृत्यात सहभागी झालोय याचे भानही नसते. 

नियत साफ नसलेला नेता आणि निर्बुद्ध अनुयायी असलेला देश रसातळाला जायला वेळ लागत नाही. हे इतिहासात दिसून आलेले आहे. म्हणूनच काळजी वाटते.

Monday, January 13, 2020

छळछावण्या आणि डिटेन्शन कॅम्प्स

२०१४ साली मी एक फेसबुक पोस्ट टाकली होती. ती खालील प्रमाणे होती.

*आपणाला व्हाट्सअप किंवा फेसबुक वर एखादा व्हिडिओ मिळायचा, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला खुलेआमपणे लोक चिरडून मारताहेत, जाळून मारत आहेत,  ठेचून मारत आहेत किंवा भोसकून मारताहेत. आणि ते पाहताना आपल्या तोंडातून शिवी बाहेर पडायची,  किती नालायक लोक आहेत, किती नीच लोक आहेत, वगैरे वगैरे... आणि हे सगळे विचार मनात येत असतानाच दुसरा विचार मनात यायचा, किती बरे आहे आपल्या देशात हे होत नाही. हे कुठेतरी लांब अफगाणिस्थान, सीरिया, इराक वगैरे देशांमध्ये होते. आपल्याकडे होत नाही, ही किती चांगली गोष्ट आहे. परंतु हे सगळे आपल्याकडे सुद्धा आता लवकरच होईल. आपल्याकडे सुद्धा खुलेआम रस्त्यावर लोकांचे खून केले जातील. झुंडीने लोक एखाद्या व्यक्तीला मारतील.*

 ही पोस्ट टाकल्यानंतर अनेक लोकांनी कमेंट केल्या होत्या की असे काही होणार नाही. हा फक्त कल्पनाविलास आहे, वगैरे वगैरे. परंतु गेल्या पाच वर्षात हे सगळे तंतोतंत खरे ठरले. अनेक ठिकाणी मॉब लिंचींगच्या घटना उघडकीस आल्या. आणि विशेष म्हणजे मॉब लिंचींग करणाऱ्यांना सरकारमधील लोक पाठिंबा देत होते. इतकेच नाही तर या कृत्याबद्दल त्यांचा सत्कारही करत होते. हे भाकीत खरे ठरले याचे कारण म्हणजे सत्तेतील लोकांचा DNA जगजाहीर आहे. धर्मांधांच्या डीएनएमध्ये हिंसा by default असते, हा इतिहास आहे. याच आधारावर दुसऱ्या एका पोस्टमध्ये पुढचे भाकितही वर्तवले होते. लवकरच गॅस चेंबर आणि छळ छावण्यांची उभारणी केली जाईल. हिटलरने ज्यू लोकांची गॅस चेंबरमध्ये आणि छळ छावण्यांमध्ये कत्तल केली होती. अगदी तसेच भारतातही होईल, असे त्या पोस्टमध्ये मी म्हटले होते. मित्रहो, लवकरच हे आता होऊ घातले आहे. सरकारला विरोध करणारे लोक आणि शत्रू ठरवलेले इतर धर्मांचे लोक यांना डीटेन्शन कॅम्पमध्ये डांबून इतिहासाची पुनरावृत्ती केली जाणार आहे. भारताचा जर्मनी होणार आहे. आत्ताच सावध व्हा. नाहीतर पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. इतिहासातून काहीतरी शिका. खूप मोठ्या कष्टाने, अनेक लोकांच्या बलिदानाने हे स्वातंत्र्य तुम्हाला मिळालेले आहे. त्याची कदर करायला शिका. स्वतःलाच गुलामीचे दूत होऊ देऊ नका.