रविवार, २७ सप्टेंबर, २०२०

कोरोना आणि अंधश्रद्धा

 भारतात कोरोनाने शिरकाव केला तेव्हाच निश्चित झाले होते की याबाबतच्या अंधश्रद्धाही लवकरच येणार. आणि तसेच झाले. लॉकडाऊन घोषित होतोय न होतोय तोवरच सोशल मिडियातून अमुक मंत्र म्हणा म्हणजे कोरोना होणार नाही, तमुक विधी करा म्हणजे कोरोना होणार नाही, अशा स्वरूपाचे मेसेज व्हायरल होऊ लागले. अगदी शिकलेले लोक सुद्धा काहीही सांगू लागले. खरे तर हे आपल्यासाठी नवीन नाही. बाळाला साधा ताप आला तरी मीठ-मिरची उतरून टाकणारा आपला समाज कोरोनाच्या काळात नवीन अंधश्रद्धा तयार करणार हे सांगायला कोणा भविष्यवेत्त्याची गरज नव्हती. आम्ही पूर्वीपासून हेच करत आलोय. स्मॉलपॉक्स सारख्या आजाराला आमचा समाज ‘देवीचा आजार म्हणायचा. हा आमचा इतिहास आहे.  तो तथाकथित ‘देवीचा आजार आजार घालवायला कुठलीही देवी मदतीला आली नाही. शेवटी विज्ञानानेच ते काम केले. विज्ञानाने लस शोधून काढली आणि ‘देवीचा आजार जगातून नष्ट करून टाकला. कॉलरा, पटकी, नारू कित्येक आजार आले आणि गेले. गेल्या नाहीत तेवढ्या अंधश्रद्धा. विज्ञानाने कितीही प्रगती केली, शिक्षणाचा कितीही प्रसार झाला आणि अंधश्रद्धेने कितीही नुकसान झाले तरी आम्ही आमच्या अंधश्रद्धा सोडायला तयार नाही आहोत.  कोरोनाने हेच सिद्ध केले आहे.

आता हेच बघा ना डॉक्टर्स, शासन आणि प्रशासन ओरडून सांगत आहे की कशामुळे कोरोना होतो आणि कशामुळे होत नाही. तरीही याबाबत विविध अंधश्रद्धा जन्माला आल्याच. कमकुवत मनाच्या आणि अगतिक लोकांना आपण समजून घेऊ शकतो. परंतु स्वतःची पोळी भाजून घेऊ पाहणारे समाजातील काही बदमाष लोक मात्र निश्चित दोषी ठरतात. केवळ प्रसिद्धीसाठी आणि त्याचा फायदा आपल्या धंद्यासाठी व्हावा यासाठी ‘कोरोना तुमचे काहीच वाकडे करू शकणार नाही.’ असली विधाने एक आयुर्वेदिक डॉक्टरच करत असेल तर अज्ञानी आणि अगतिक लोकांना का दोष द्यावा? पण पुढे जाऊन तो डॉक्टर स्वतःच कोरोनामुळे मृत्यू पावल्यावर तरी लोकांनी शहाणे व्हायला हवे ना. पण असे काही होताना दिसत नाही. इतकी जागृती करूनही कोरोनाबाबतच्या अनेक अंधश्रद्धांनी देशात जन्म घेतला आहे. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे काही महिलांनी कोरोना देवीची स्थापना केलीय. इतकेच नाही तर तिला प्रसन्न करण्यासाठी तिला कोंबड्या-बकऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवला जातो असे समोर आले आहे. कोरोना देवीची पूजा केल्यावर कोरोनाची बाधा होत नाही अशी तिथल्या महिलांची समजूत आहे. ही समजूत किती घातक आहे याची त्या महिलांना जाणीवही नाही. हे केवळ बार्शीतच नाही तर सगळ्या देशभर होत आहे. बिहारमध्ये काही महिलांनी कोरोना मैयाचा शोध लावला आहे. तिथेही असेच देवीला खुश करण्याचे अनेक विधी केले जात आहेत. झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाला पळवून लावण्यासाठी चारशे बकऱ्यांचा बळी दिला आहे. कर्नाटकात बेळगाव परिसरात अमावास्येच्या रात्री जो झोपेल तो कायमचा झोपेल अशी अंधश्रद्धा पसरली. त्यामुळे हजारो लोकांनी रात्र जागून काढली. सोलापुरातील काही पुरोहितांनी कोरोनाचा प्रसार थांबवा म्हणून मृत्युंजय मंत्राचा जप चालू केला. इतके करूनही कोरोनाचा प्रसार थांबला नाहीच. कसा थांबेल? अशा गोष्टींनी आजार थांबले असते तर डॉक्टरांची गरज काय होती?

कोरोना होऊ नये म्हणून कोणी यज्ञ करण्याचा सल्ला देत आहे, कोणी नामस्मरण करण्याचा सल्ला देत आहे. कोणी गंडे-दोरे आणि ताईत बांधण्याचा सल्ला देत आहे. तर कुठे कणकेचे दिवे लावण्याचा प्रकार घडत आहे. कोरोनावाले बाबा सुद्धा जाहिरातींमधून दिसू लागले. कटकमध्ये तर एका पुजाऱ्याने कोरोना घालवण्यासाठी नरबळी दिल्याची घटना घडली. त्या पुजाऱ्याने कोरोनाचे संकट टळावे म्हणून एका व्यक्तीचा बळी देऊन त्याचे मुंडके ब्राम्हणी देवीला अर्पण केले. भिडे गुरुजींनी तर गाईचे तूप आणि गोमुत्राने कोरोना बरा होतो असे सांगितले. हिंदू महासभेचे स्वामी चक्रपाणी यांनी तर गोमुत्राबरोबर शेणही खाण्याचा सल्ला दिला आहे. अंधश्रद्धेची आग अशी भडकत असताना काही राजकारणी लोक सुद्धा या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहेत. ‘पापड खा आणि कोरोना बरा करा असा सल्ला केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिला. त्यावेळी हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. लोकांना पापड खाऊन कोरोना बरा करण्याचा सल्ला देणारे हे मंत्रीमहोदय स्वतःला कोरोनाची बाधा झाल्यावर मात्र एम्स रुग्णालयात दाखल झाले. म्हणजे जनता कोरोनाने मेली तरी चालेल अशीच त्यांची भावना नाही का? उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना मुक्तीसाठी हनुमानाला ५१ मास्क अर्पण केले. मुख्यमंत्र्यानेच अशा गोष्टींना प्रोत्साहन दिले तर जनता दुसरे काय करणार?

गाडगेबाबासारख्या संताने रोगराई पळवण्यासाठी स्वच्छतेचा संदेश दिला आहे. तो आचरणात आणायचे सोडून आपले लोक अंधश्रद्धा, देव-देवता आणि कर्मकांडातच गुंतून राहिले ही या देशाची मोठी शोकांतिका आहे. तरी एक चांगली गोष्ट घडत आहे. या सगळ्या गोष्टींबाबत जनजागृती करण्याचे काम इथलेच काही लोक करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या संघटना तर यात खूप चांगले योगदान देत आहेत. समाजातील जाणत्या आणि कर्त्या लोकांनी अशा प्रयत्नांना पाठबळ द्यायला हवे.

शेवटी शासन, प्रशासन, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि सुजाण नागरिक यांच्या प्रयत्नातून आपण कोरोनाचे संकट आपण निश्चित परतवून लावू असा आशावाद मी व्यक्त करतो आणि थांबतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा