Thursday, July 23, 2020

सापाबद्दल तुम्ही ऐकलेल्या या गोष्टी खोट्या आहेत


   आपण नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. आपल्या देशातील कृषी संस्कृतीच्या दृष्टीने नागपंचमीचा सण महत्त्वाचा आहे. परंतु त्याच वेळी साप दिसला रे दिसला तो मारून टाकण्याची प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये दिसून येते. सापाबद्दल प्रचंड अज्ञान आणि अंधश्रद्धा दिसून येतात. अनेक गैरसमज दिसून येतात. या लेखामध्ये सापाबद्दलच्या या अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत आहे.
१) सापाबद्दल संपूर्ण भारतात आढळणारा आणि चित्रपट सृष्टीने मोठ्या प्रमाणात खतपाणी घातलेला गैरसमज म्हणजे साप डूख धरतो. सिनेमामध्ये काहीही दाखवले तरी आपण मनाशी खूणगाठ बांधा की साप कधीही डूख धरत नाही. सापाची कोणतीही जात डूख धरत नाही. सापाचा मेंदू इतर प्राण्यांच्या मानाने अतिशय अविकसित असा मेंदू आहे. तो इतका अविकसित आहे की तो माणसाचा चेहरा लक्षातच ठेवू शकत नाही. तसेच सापाची दृष्टीही कमजोर असते. विशेषतः कातणीला आलेल्या सापाची दृष्टी तर खूपच कमजोर असते. त्यामुळे सापाला व्यक्तीचा चेहराही स्पष्टपणे दिसत नाही. या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्या लक्षात येईल की साप डूख धरू शकत नाही.
२) सापाबद्दल आढळणारा दुसरा गैरसमज म्हणजे साप दूध पितो. गारुडी लोक आणि चित्रपटांनी हा गैरसमज वाढीस लावला आहे. साप हा मांसाहारी प्राणी आहे. दूध हे सापाचे अन्न नाही. उलट दूध हे सापासाठी विष ठरू शकते. कारण दूध सापाला पचत नाही. त्यामुळे साप दूध पितो हा गैरसमज आहे हे लक्षात घ्या. काही गारुडी लोक सापाला खूप दिवस पाणी देत नाहीत. त्यामुळे तहानलेला साप समोर दूध ठेवल्यास पाणी समजून पितो. परंतु एरव्ही साप दूध पीत नाही.
३) साप अमर असतो असाही एक गैरसमज आहे. साप म्हातारा झाला की कात टाकतो आणि आणि तो पुन्हा तरुण होतो, त्यामुळे तो मरत नाही, असा एक गैरसमज आहे. परंतु तसे काही नाही. पृथ्वीवरील इतर सजीवांप्रमाणे सापही मर्त्य प्राणी आहे. सापांच्या वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे आयुष्यमान आहे.
४) नागा जवळ नागमणी असतो असे काही चित्रपट, काही फेक व्हिडीओ आणि अनेक चर्चांमधून पाहायला आणि ऐकायला मिळते. परंतु नागमणी असणारा साप नसतोच. अनेक सर्प तज्ञांनी सापांवर लक्ष ठेवून, वेगवेगळ्या पद्धतीने सापांचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे की कोणत्याही नागा जवळ नागमणी नसतो.
५) सापाच्या अंगावर केस असतात असे काहीजण सांगतात. हेही खोटी आहे. साप हा सस्तन प्राणी नाही. तो सरपटणारा प्राणी आहे. जगामध्ये केस असणारा साप कुठेही नाही. गारुडी लोक सापाच्या त्वचेमध्ये इतर प्राण्यांचे केस सुईने रोवतात आणि लोकांना केस असणारा साप आहे असे सांगतात.
६) साप धनाचे रक्षण करतो असे सांगितले जाते. यातही काही तथ्य नाही. पूर्वीच्या काळी लोक धनसंपत्ती घरांमध्ये, जुन्या वाड्यांमध्ये पुरून ठेवायचे. पुढे जुनी घरे किंवा वाडे यांची पडझड झाल्यानंतर तिथे उंदीर घुशी यांचे प्रमाण वाढते आणि त्यांना खाण्यासाठी तिथे सापही येतात. अशा घराच्या ठिकाणी नवीन बांधकाम वगैरे करताना साप आणि पुरून ठेवलेले धन एकत्र सापडू शकते. याचा अर्थ साप धनाचे रक्षण करत होता, असा नाही.
७) मेलेला साप रॉकेलने जिवंत होतो असे सांगितले जाते. हाही गैरसमज आहे. साप मारताना त्याचे डोके ठेचले जाते आणि असा साप मेला तरी त्याच्या बाकीच्या शरीरातील पेशी जिवंत असतात. त्या लगेच मरत नाहीत. त्यामुळे सापावर रॉकेल ओतल्यानंतर सापाचे शरीर हालचाल करते. यालाच लोक साप जिवंत झाला असे म्हणतात. परंतु मेलेला साप जिवंत होणे सर्वस्वी अशक्य आहे.
८) सापाचे दोन तुकडे केल्यास सापाचे मुंडके मारणाऱ्याचा माग काढत राहते आणि मारणाऱ्या व्यक्तीचा बदला घेते, असा एक गैरसमज आहे. अर्थातच हे चुकीचे आहे. साप मेल्यानंतर सर्व संपते. सापाचे आयुष्य संपून जाते. मुंडकेही निर्जीव होऊन जाते.
९) मंत्राने सापाचे विष उतरते, हा एक मोठा गैरसमज लोकांच्या मनामध्ये रुजून बसलेला आहे. या गैरसमजामुळे काही लोक विषारी साप चावल्यानंतर वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी मंत्रतंत्र करत बसतात आणि हकनाक व्यक्तीचा जीव घालवून बसतात. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार मंत्राने विष उतरवणे हा गुन्हा आहे, हे इथे लक्षात घ्यावे.
१०) पूजेने साप प्रसन्न होतो असे लोक मानतात. हाही गैरसमज आहे. पूजेचा अर्थ समजण्याइतकी बुद्धी सापाला नाही. त्यामुळे तो प्रसन्न होण्याचा प्रश्नच नाही. काही लोक तर नागपंचमीच्या दिवशी सापाला नवस बोलतात. नवस वगैरे अंधश्रद्धा आहेत हे आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे. 

   सापाबद्दल आणखीही काही गैरसमज आणि अंधश्रद्धा देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आहेत. सगळ्याच इथे सांगणे शक्य नाही. पण आपणाला जेवढे माहीत आहे तेवढे लोकांना सांगणे आणि त्यांचे गैरसमज दूर करणे आपले काम आहे. आपणही हा लेख शेअर करून हे काम करावे अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment