मंगळवार, २३ जुलै, २०२४

एका माणसामुळे समूह पूर्ण व्हिलन ठरत नसतो

 'अ' या व्यक्तीने 'ब' या व्यक्तीचा खून केला. याचा बदला म्हणून 'क' या व्यक्तीचा खून करण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते? गुन्हेगार 'अ' आहे; पण शिक्षा केली जाते 'क' ला. या गोष्टीला तुम्ही न्याय्य समजाल का?

विचारी माणूस अर्थातच या गोष्टीचे कधी समर्थन करणार नाही. ही गोष्ट न्याय्य समजणार नाही. उलट ही गोष्ट म्हणजे माणुसकीच्या विरोधातली होईल. पण समाजात अलीकडच्या काळात असे होत आहे आणि याचे हिरीरीने समर्थनही केले जात आहे. ज्यावेळी 'अ' ने 'ब' ला मारले तेव्हा तुम्हाला कसे चालले? आता क ला मारले म्हणून का ओरडताय? असा सवालही विचारला जातोय. दूर परदेशात कुठेतरी मुस्लिम नेत्याला किंवा मुस्लिम अतिरेक्याला मारले जाते आणि त्याचा बदला म्हणून भारतात अतिरेकी हल्ले होतात. पाकिस्तानमध्ये हिंदूंच्यावर अत्याचार केले जातात म्हणून भारतातल्या मुस्लिमांच्यावर अत्याचार करून त्याचे समर्थन केले जाते. कधीकाळी काश्मीरमध्ये हिंदूंवर हल्ले केले गेले त्याचा बदला म्हणून महाराष्ट्रात मुस्लिमवर हल्ले करायचे आणि वर त्याचे समर्थनही करायचे. या गोष्टी माणुसकीला काळीमा फारसणाऱ्या आहेत. केवळ धर्माच्या आधारे माणसांचे वर्गीकरण करून पूर्ण समूहालाच व्हिलन ठरवणे अतिशय चुकीची गोष्ट आहे. कारण धर्मांधता सर्व धर्मांमध्ये आहे. सर्व धर्मांमध्ये अतिरेकी विचारांचे लोक आहेत. एखाद्या धर्मातील अतिरेकी विचाराच्या लोकांचा दाखला देऊन त्या धर्मातील सर्वच लोकांना अतिरेकी समजणे केवळ चुकीचेच नाही तर मूर्खपणाचे देखील आहे. आपण जितक्या लवकर या मूर्खपणातून बाहेर पडू तेवढे आपल्या फायद्याचेच आहे. कारण मूर्खपणाची सवय घातक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा