शनिवार, ३ ऑगस्ट, २०२४

'शिवाजी कोण होता?' पुस्तकात शिवरायांचा उपमर्द नाही

   


कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाने शिवाजी महाराजांबद्दलचे अनेक गैरसमज दूर केले. तसेच सर्वसामान्यांना उपलब्ध नसलेली काही नवीन माहिती उपलब्ध करून दिली. या पुस्तकामुळे शिवाजी महाराजांच्या नावाचा हिंदुत्ववादी राजकारणासाठी उपयोग करणाऱ्यांची मोठीच गोची झाली. शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात होते, ते हिंदू धर्मरक्षणासाठी लढत होते, ते गो-ब्राह्मण प्रतिपालक होते, असे अनेक गैरसमज हिंदुत्ववाद्यांनी पसरवले होते. पण 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकामुळे त्यांची खूपच गोची झाली. सत्य इतिहास सांगणारे हे पुस्तक खूपच गाजले. त्याच्या आवृत्यांमागून आवृत्या निघाल्या. हिंदुत्ववाद्यांनी मग एक नवीनच पिल्लू सोडले. या पुस्तकात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे, अशी ओरड करायला त्यांनी सुरुवात केली. 'शिवराय' न म्हणता 'शिवाजी' म्हणणे म्हणजे जणू काही मोठे पापच आहे, अशा पद्धतीने प्रचार सुरू केला. विशेषतः शिवप्रतिष्ठानवाल्यांनी असा खूपच प्रचार केला. त्याला बरेच लोक बळी पडले. अगदी पुरोगामी चळवळीतील लोकही बळी पडले. अलीकडे शिवजयंतीच्या निमित्ताने 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाची पीडीएफ व्हाट्सअपवरून दरवर्षी व्हायरल होते. पण त्याचबरोबर शिवाजीचा एकेरी उल्लेख केला म्हणून ग्रुपमध्ये पीडीएफ टाकणाऱ्या व्यक्तीला दमबाजी केली जाते. काही ठिकाणी तर शिव्या दिल्या जातात. 'महाराजांचे नाव घेण्याची तुमची लायकी आहे का?' इथपासून आई-बहिणीपर्यंत शिव्या दिल्या जातात. खरेतर शिवाजी राजा हा इथल्या लोकांच्या हृदयामध्ये  आहे. प्रेमाने ते शिवबा म्हणतील, शिवाजी म्हणतील, शिवराय म्हणतील किंवा शिवाजी राजा म्हणतील. प्रत्येक शिवप्रेमीला कोणताही शब्द वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. यातल्या कुठल्याही शब्दांमध्ये शिवाजी महाराजांचा उपमर्द नाही किंवा अपमान ही नाही. मुळात एकेरी उल्लेखामध्ये अपमान किंवा उपमर्द असतो हेच चुकीचे आहे. 

शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आजच केला जातोय का? तर तसेही नाही. खूप जुन्या काळापासून तो केला जातोय. पुस्तकांमधून तर तो आहेच, पण लोकसाहित्यातही तो आहे. असे असताना आजच 'शिवाजी म्हणू नका शिवराय म्हणा' अशी दमबाजी कशासाठी? अशी दमबाजी करण्यात पुढे असणाऱ्या शिवप्रतिष्ठानवाल्यांनी बाबासाहेब पुरंदरेंच्या ज्या पुस्तकाच्या एक लाख प्रती विकल्या होत्या त्या 'राजा शिवछत्रपती' पुस्तकातही शिवाजीचा एकेरी उल्लेख आढळतो. पण शिवप्रतिष्ठानवाल्यांनी तिथे कधी विरोध केला नाही. विरोध फक्त गोविंद पानसरे यांच्या पुस्तकालाच असतो. बाबासाहेब पुरंदरे यांनी एकेरी उल्लेख केला तर चालतो; परंतु गोविंद पानसरे यांनी एकेरी उल्लेख केलेला चालत नाही. कारण स्पष्ट आहे. 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक लोकांनी वाचू नये यासाठीच असा दुष्प्रचार केला जातोय.

    खरेतर गोविंद पानसरे यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकातून शिवरायांचे चरित्र कितीतरी प्रभावीपणे लोकांच्या समोर मांडले आहे. शिवरायांबद्दल अतीव प्रेम वाटावे, इतकी चांगली मांडणी त्यांनी या पुस्तकात केली आहे. सहाजिकच शिवरायांचा उपमर्द किंवा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नाही हे स्पष्ट आहे. तेव्हा या पुस्तकाच्या नावाबद्दल कुणी आक्षेप घेतलाच तर त्यांना 'आधी पुस्तक वाचा', असे सांगा. तरीही त्यांचा कांगावा सुरूच राहिला; तर शिवराय आमचे आहेत. त्यांना आम्ही काय म्हणायचे आणि काय म्हणायचे नाही ते आम्ही ठरवणार. तुम्ही आम्हाला सांगणारे कोण? असे खडे बोल सुनवा.