मंगळवार, १८ जून, २०२४

धर्माचे रक्षण देव स्वतः का करत नाहीत?

  





   धर्माचे ठेकेदार, बुवा-बाबा लोक आणि काही धार्मिक संप्रदाय नेहमी सांगत असतात की देवावर विश्वास ठेवा, देवाची भक्ती करा, पूजा-अर्चना करा, नामस्मरण करा, वगैरे वगैरे. हे सगळे केल्यावर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, आलेली संकटे जातील, अडलेली कामे होतील, इच्छांची पूर्तता होईल, नोकरी-व्यवसायात यश मिळेल, आजारपण दूर होईल, असे अनेक दावे केले जातात. मुद्दा हाच की देवाची भक्ती करा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, श्रद्धेने त्याची पूजा-अर्चना आणि इतर विधी करा, तुमच्या जीवनातील सगळे अडचणी दूर होतील. देवाबाबत इतके अचाट दावे हे लोक करत असतात.


    दुसऱ्या बाजूला हेच लोक लोकांना सांगतात, 'तुम्हारा धर्म खतरे में है. ते दुसऱ्या धर्माचे लोक तुमच्या धर्माला नष्ट करून पाहत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी तयार व्हा.' आणि मग एकत्र येऊन धर्मरक्षणाची प्रतिज्ञा करा, इथपासून घरात तलवारी ठेवा इथपर्यंत सल्ले दिले जातात. सल्ले कसले आदेशच ते. धर्मरक्षणासाठी धर्माबाबत कमी जास्त बोलणाऱ्याला शिवीगाळ करण्यापासून मारहाण आणि पुढे जाऊन खून करण्यापर्यंत जे काही करणे शक्य आहे ते करा, ते धर्मकार्यच आहे असे सांगितले जाते.


    वरील दोन गोष्टी पाहून मला एक मोठा प्रश्न पडतो. भक्तांचे सगळे प्रश्न सोडवणारा देव धर्मरक्षण स्वतःचे स्वतः करू शकत नाही का?

    एकीकडे देवाकडे अचाट शक्ती आहे, सगळ्या गोष्टींचा कर्ता करविता तोच आहे, भक्तांच्या जीवनात येणाऱ्या सगळ्या अडचणी तो चुटकीसरशी दूर करू शकतो, वगैरे अफाट दावे केले जातात. इतका ताकदवान असणारा देव दुसऱ्या धर्माच्या लोकांपुढे दुर्बल होतो का? मुस्लिमांचा देव हिंदू काफिरांपुढे नांगी टाकतो आणि हिंदूंचे देव मुस्लिमांपुढे हतबल होतात असे काही आहे का? नेमके आहे तरी काय? या धर्म मार्तंडांनी एकदा काय ते स्पष्ट करावे. देव सर्वशक्तिमान असतील तर त्याने धर्मरक्षण स्वतःचे स्वतः करावे. कारण माणूस दुर्बल आहे. आणि जर देव सर्वशक्तिमान नसतील, त्यांना धर्मरक्षण करता येत नसेल तर अशा दुर्बल देवांची पूजा करायला धर्ममार्तंडांनी लोकांना सांगू नये. देव काहीही करू शकत नाहीत हे एकदाचे जाहीर करून टाकावे.

टीप- ही पोस्ट सर्व धर्मांना लागू आहे.

शुक्रवार, १४ जून, २०२४

विरोधी पक्षांनी स्वतःचा मीडिया उभा करायला हवा

 लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाले आहे. नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. पण या निवडणुकीत इंडिया आघाडीनेही अभूतपूर्व यश मिळवले आहे. याला कारण सामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली होती. सामान्य जनतेने जमेल त्या मार्गाने, सोशल मीडियाचा वापर करून, रस्त्यावर उतरून इंडिया आघाडीचा प्रचार केला.  सर्व विरोधक एकत्र येणे ही सुद्धा गोष्ट पथ्यावर पडली. पण तो आजच्या चर्चेचा विषय नाही. आजच्या चर्चेचा विषय आहे गेल्या दहा वर्षात विरोधी पक्षाने केलेल्या घोडचुकीचा.

     २०१२ पासूनच भारतातील मीडियाने विशेषतः टीव्ही चॅनल्सनी भाजपाच्या बाजूने प्रचार करण्यास सुरुवात केली होती. भारतातील बऱ्याच अंशी निष्पक्ष असणारा मीडिया २०१२ पासून पक्षपती बनल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसला संपूर्ण देशभरात हार पत्करावी लागली आणि भाजपाला बहुमत मिळाले. जनतेने एकहाती सत्ता भाजपाला दिली. यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका भारतातल्या मीडियाने बजावलेली होती. काँग्रेसला सतत बदनाम करणे, खऱ्या-खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्या चालवणे हे काम मीडियाने सातत्याने केले. त्याचा परिणाम म्हणूनच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांची प्रतिमा डागाळली गेली. हे सगळे स्पष्ट दिसत असताना २०१४ ते २०२४ या काळात विरोधी पक्षांमधील एकाही पक्षाने आपल्या स्वतःचा मीडिया उभा करण्याचा प्रयत्न केला नाही. या दहा वर्षात एकाही पक्षाला स्वतःची बाजू मांडणारे टीव्ही चॅनल उभे करता आले नाही. गोदी मीडिया बनलेले टीव्ही चॅनल्स दहा वर्षे सतत हिंदू-मुस्लिम करत राहिले; पण धर्मनिरपेक्षतेचा आवाज बनेल असे एकही टीव्ही चॅनेल विरोधकांना उभे करता आले नाही. एखाद्या पक्षाने टीव्ही चॅनल सुरु करणे कदाचित नियमात बसत नसावे. पण अन्य मार्गाने टीव्ही चॅनेल सुरु करणे अवघड नव्हते. 

    भाजपाने त्यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांचा आवाज विविध मार्गांनी बंद केला होता. त्यामुळे अभिसार शर्मा' अजित अंजुम, रविष कुमार, निखिल वागळे, हर्षदा स्वकुळ असे अनेक पत्र पत्रकार बेरोजगार झाले होते. त्यांनी आपापला मार्ग स्वतःच्या हिमतीवर शोधला. अशा पत्रकारांना जर योग्य विचारपीठ मिळाले असते तर त्यांनी भाजपा सरकारची सगळी अंडीपिल्ली अधिक ताकतीने बाहेर काढून जनतेला सजग केले असते आणि विरोधकांचा मार्ग सोपा झाला असता. भारतीय लोकशाहीला धोका उत्पन्न झाला नसता. पण भारतातल्या विरोधी पक्षांनी या बाबीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. पुढच्या काळात तरी विरोधक ही चूक सुधारतील अशी अपेक्षा करूया.