बहुजन लोकांना कर्मकांडात अडकवण्याची वैदिकांची खुमखुमी कधीच जाणार नाही. बहुजन जेवढे कर्मकांडात अडकतील तेवढे आपले वर्चस्व अबाधित राहील याची वैदीकांना खात्री आहे. म्हणूनच सातत्याने ते नवनवीन कर्मकांडे निर्माण करीत आलेले आहेत अगदी ३०-४० वर्षांपूर्वी बहुजनांच्या घरात महालक्ष्मी व्रत, वैभव लक्ष्मी व्रत होत नव्हते. पण बहुजन लेकी शिकायला लागल्या. विचार करायला लागल्या. मग त्यांना कर्मकांडात अडकवण्यासाठी या व्रतांची निर्मिती करण्यात आली. दोनशे वर्षांपूर्वी कुठल्याही गावात सत्यनारायण घातला जात नव्हता. तोही आमच्या माथी थोपला. हिंदू धर्मात घुसखोरी करून आपले वर्णवर्चस्ववादी अजेंडे वैदिकांनी नेहमीच राबवले आहेत.
अलीकडच्या काळात बलिदान मास नावाचे एक थोतांड एका संघटनेकडून महाराष्ट्रात माजवले जात आहे. औरंगजेबाच्या आदेशाने संभाजी राजांची हत्या केली गेली म्हणून हा बलिदान मास पाळला जाऊ लागला आहे. वरवर पाहता यात आक्षेपार्ह काही वाटणार नाही. पण हे बहुजनांच्या मुलांच्या डोक्यात मुस्लिमद्वेष भरवण्याचे कारस्थान आहे. इतिहासातली मढी उकरून आत्ताच्या मुस्लिमांना लक्ष्य करण्याचे हे षडयंत्र आहे.
खरे तर इतिहासामध्ये या देशासाठी केवळ संभाजीराजांचा बली गेला आहे असे नव्हे. अगदी समाजजागृती करणाऱ्या संतांचाही खूनच झालेला आहे. इतर संतांचे मृत्यू संशयस्पद आहेत; पण तुकाराम महाराज यांचा खून ठळकपणे दिसून येतो. शिवाजी महाराज यांचा मृत्यूही नैसर्गिक नाही. त्यांनाही या मातीसाठी बलिदानच द्यावे लागले आहे. शहीद भगतसिंग यांनी या मातीसाठीच बलिदान दिले ना? महात्मा गांधींचे बलिदान या देशासाठीच होते. अशा शेकडो लोकांचे बलिदान या देशासाठी झालेले आहे. कुणा-कुणाकुणाचा बलिदान मास पाळणार? ते या महामानावांचा बलिदान मास पाळणार नाहीत. कारण या बलिदानामध्ये त्यांच्याच पूर्वजांचे हात रक्ताने रंगलेले आहेत. स्वातंत्र्यलढ्यासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या विरोधात फितुरी करणारे त्यांचेच पूर्वज होते. स्वराज्याच्या विरोधात फितुरी करणारे त्यांचेच पूर्वज होते. आणि आता केवळ मुस्लिमद्वेष वाढवण्यासाठी त्यांना संभाजी राजांचा पुळका येतोय. जेम्स लेनने राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे तेव्हा त्यांना पुळका आला नाही. राज्यपाल भगतसिंग कोशियारी याने शिवरायांचा अपमान केला. अहमदनगर मधील भाजपचा नगरसेवक छिंदम यांने शिवरायांचा अपमान केला. भाजपचा पदाधिकारी सुधांशू द्विवेदी याने शिवरायांचा अपमान केला. राहुल सोलापूरकर याने शिवरायांचा अपमान केला. प्रशांत कोरटकर यांने शिवरायांचा अपमान केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामात भ्रष्टाचार झाल्यामुळे तो पुतळा वाऱ्याने पडला. या सगळ्या वेळी या संघटनेचा पुढारी तोंडात मूग गिळून गप्प बसला. तो बलिदान मासाचे नाटक करत आहे. पदोपदी शिवराय, जिजाऊ, छत्रपती संभाजी यांचा अपमान होत असताना तो गप्प बसतो आणि त्यांच्या बलिदानाचे भांडवल करून मुस्लिमद्वेष वाढवतो, हे षडयंत्र ओळखायला हवे.
बलिदान मास कसा पाळला जातो? संघटनेने दिलेली स्तोत्रे गायची, ज्या स्तोत्रांमध्ये मुस्लिमद्वेष ठासून भरलेला आहे. पायात चप्पल घालायची नाही. केस कापायचे नाहीत. नखे कापायची नाहीत. असला सगळा मूर्खपणा आहे. बलिदान मास पाळण्यासाठी दररोज चार-तास अभ्यास करण्याचे कर्मकांड का सांगितले नाही? बलिदान मास पाळण्यासाठी दररोज सकाळी अर्धा तास व्यायाम करण्याचे कर्मकांड का सांगितले नाही? बलिदान मासात दररोज ग्रामस्वच्छता का केली जात नाही? असे उपक्रम घेतले जात नाहीत? कारण त्यांना विधायक काही करायचेच नाही. त्यांना केवळ लोकांना अंधश्रद्ध बनवणारे, लोकांना धर्मांध बनवणारे उपक्रमच हवे आहेत. समाजात इतके प्रश्न आहेत त्यावर हे कोणताही उपक्रम राबवणार नाहीत. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यासाठी या संघटने कधीही आंदोलन उभारले नाही. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे पुरवले. शेतकऱ्यांच्या शेतीचे रक्षण करण्यासाठी आपल्या सैनिकांना आज्ञा दिल्या. शेतकऱ्यांना कर्जे पुरवली. शेतीची मोजणी करून नवीन शेतसारा पद्धत सुरू केली. पण उठता-बसता शिवरायांचे नाव घेणारे हे लोक शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत. बलिदान मासाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून एखादा दिवस धरणे आंदोलन करायला काय हरकत आहे? पण हे ते करणार नाहीत. त्यांना शेतकरी सुखी झालेला नव्हे गुलाम झालेला पाहायचा आहे. म्हणूनच आपल्या मुलांना त्यांच्या बलिदान मासापासून आणि इतर उपक्रमांपासून दूर ठेवायला हवे.